बिलिंगमध्येही सेल्फ सर्व्हिस कियोस्क! 

महेश बर्दापूरकर 
सोमवार, 22 मे 2017

मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर बिल भरण्यासाठी उडणारी झुंबड ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून सेल्फ सर्व्हिस कियोस्कची व्यवस्था निर्माण केली जात असून, पुढील पाच वर्षांत बिलिंग व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत... 

मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर बिल भरण्यासाठी उडणारी झुंबड ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून सेल्फ सर्व्हिस कियोस्कची व्यवस्था निर्माण केली जात असून, पुढील पाच वर्षांत बिलिंग व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत... 

स्वतःचेच पैसे काढण्यासाठी बॅंकेत जाऊन स्लिप भरणे आणि टोकन घेऊन नंबर येईपर्यंत वाट पाहण्याचे दिवस आता जवळपास इतिहासजमा झाले आहेत. बॅंकिंग सिस्टिममधील तंत्रज्ञानात आता आणखी मोठे बदल घडत असून, पैसे काढणे आणि भरण्याची व्यवस्था अधिकाधिक सुलभ होत आहे. अशीच पैसे भरण्यासाठी रांगेत खस्ता खायला लावणारी व्यवस्था म्हणजे मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर पैसे भरण्यासाठी लावावी लागणारी रांग! मॉल संस्कृतीचा वेगाने प्रसार होताना बिलिंगसाठीच्या लाइन डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. यावर उपाय शोधण्याचे अनेक पर्याय योजले जात आहेत. मॉलचालक मानवी हस्तक्षेप व बिलाची लाइन टाळण्यासाठी अनेक ठिकाणी सेल्फ चेकआउट (वस्तू घेतल्यावर तिथेच आणि स्वतःच बिल तयार करून पैसे भरण्याची व्यवस्था) तयार केले जात आहेत. एका अंदाजानुसार, 2020पर्यंत अशा प्रकारच्या सेल्फ सर्व्हिस कियोस्कची उलाढाल 18 अब्ज डॉलरपर्यंत पोचणार असून, अशा प्रकारच्या युनिटची संख्या मागील वर्षीच्या 2 लाख 40 हजारांवरून 2020पर्यंत 5 लाखांपर्यंत पोचणार आहे. 

ग्राहकांची मानसिकता काय? 
सेल्फ सर्व्हिस व्यवस्था वेगवान व रांगेविना काम करत असल्याने ग्राहकांची तिला पसंती मिळत आहे. कंपन्यांनाही कर्मचारी कपातीची संधी मिळून फायद्यात वाढ होत आहे. मात्र, ही व्यवस्था वेगाने पसरण्याची काही मानसिक कारणे असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील प्राध्यापक रायन ब्युएल यांच्या मते, मद्याच्या एका दुकानामध्ये अशी व्यवस्था निर्माण केल्यानंतर उच्चार करण्यास किचकट असलेल्या उत्पादनांचा खप 8.4 टक्‍क्‍यांनी वाढला. आपला उच्चार चुकेल या भीतीने किंवा बिलिंग क्‍लार्कसमोर फजिती होईल या शक्‍यतेमुळे लोक अशी उत्पादने खरेदीच करीत नसल्याचे दिसून आले. असाच अनुभव पिझ्झाच्या ऑनलाइन स्टोअरच्या बाबतीतही आला आहे. फोनवर ऑर्डर देण्याऐवजी ऑनलाइन पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांनी 3 टक्के अधिक उष्मांक असलेले पदार्थ निवडले व त्यांनी पिझ्झा कसा हवा यासंदर्भात केलेल्या विशेष सूचना 14 टक्के अधिक होत्या. याचाच अर्थ ग्राहकांना आपल्या खाण्याच्या पद्धती दुसऱ्यांना समजू नये; असेच वाटते व मानवी हस्तक्षेप टाळल्यास ते अधिक खुलेपणाने व्यक्त होतात, म्हणजेच खरेदी करतात. समाजाच्या एकूणच बदलत्या मानसिकतेमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेप हेच सूत्र दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक अन्नपदार्थ पुरविणाऱ्या आउटलेट्‌सनी इंटरनेटवरून ऑनलाइन ऑर्डर देण्याची व्यवस्था उभी केली आहे. ""कियोस्क, वेबसाइट, मोबाईल ऍप आणि इतर सेल्फ सर्व्हिस सुविधांमुळे व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची घडी बसविणे सोपे जात आहे. ग्राहक या व्यवस्थांपासून दूर पळत असल्याचा दावा केला जात असला, तरी तो खरा नाही. ग्राहक अशा व्यवस्थांमध्ये त्रुटी किंवा समस्या असल्यासच त्यापासून दूर जातात. मॉलमध्ये सेल्फ सर्व्हिस काउंटरवर बार कोड नीट स्कॅन होत नसल्यास ग्राहक वैतागतातच,'' असे एका व्यवस्थापन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष सांगतो. 

एकूणच, मानवी हस्तक्षेप व मोठ्या लाइन टाळत सेवा दिल्यास सेल्फ सर्व्हिस काउंटर ही व्यवस्था खोलपर्यंत रुजणार हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self service kiosk in billing!