'एक्स-रे' चा शोध लावणाऱ्या विल्यम रॉंटजेन यांची कहाणी

निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो.
William Rantgen
William Rantgenesakal
Summary

‘निदान तंत्रज्ञान’ क्षेत्रात क्रांती करणाऱ्या या क्ष-किरणांच्या शोधकर्त्यास अर्थातच ‘विल्यम रॉंटजेन’यांना विनम्र अभिवादन.

‘मला नाही वाटत मी तपासलंय’ १८९५ ला आजच्याच सकाळपर्यंत ‘तो’ हाच विचार करत होता. तत्क्षणीच त्यानं नविनच विद्युत चुंबकिय विकीरण शोधले होते. त्याच्या या तपासानं आणि एका कागदावर लिहिलेल्या ‘नव्या पद्धतीचे विकीरण’ या वाक्यानं विज्ञानविश्वात वादळ आणलं. वैद्यकशास्रात क्रांती केली आणि १९०१ साली त्याला थेट वैयक्तिक ‘नोबेल’ही मिळवून दिला.

आज त्याचीच गोष्ट सांगतो. खरं तर जर्मन कापड व्यापारी फ्रेडरिक आणि डच चॅरलोट या दाम्पत्याचा हा एकुलता एक मुलगा आपल्या कारकिर्दीत असं काही कांड करेल याची कुणाला सुतराम कल्पना नव्हती. तो तीन वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबाने आपला मुक्काम त्याच्या डच आईच्या माहेरी अर्थात नेदरलॅंडला हलवला. तो तिथेच शाळेत गेला. शालेय दिवस मजेत टाईमपास करत चालले होते, जोपर्यंत शिक्षकाचं कार्टून काढण्याच्या पराक्रमामुळे त्याची युट्रेक्टच्या तंत्र निकेतन शाळेतून त्याची गच्छंती झाली नव्हती.

William Rantgen
माकडांवर प्रयोग करुन प्रेमभावनेचा शास्त्रीय उलगडा करणाऱ्या अवलियाची गोष्ट!

हाती पदविका नसल्यानं तो जर्मन विद्यापीठात प्रवेश घ्यायला अपात्र ठरला. ‘करे तो करे क्या?’ तेवढ्यात त्याला झुरिचमध्ये नुतन संघराज्य तंत्रविद्यानिकेतन संस्थेत एक परिक्षा देऊन प्रवेश मिळवता येतो ही बातमी कळली. ‘मरता क्या न करता?’तो आता झुरिचला रवाना झाला. त्यानं झुरिचला आपलं यांत्रिक अभियांत्रिकी शिक्षण सुरू केलं आणि त्याची गाडी सर्वार्थानं रुळावर आली अन् या गाडीनं त्याची प्रायोगिक भौतिकशास्त्रात पीएचडी संपेपर्यंत रूळ सोडला नाही. त्याला स्ट्रॅसबर्ग विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. पुढची काही वर्षे तो कधी वर्टंनबर्ग कधी वर्झबर्ग कधी गिसेन तर कधी पुनःश्च स्ट्रॅसबर्ग इथं अध्यापनात अंमळ रमला.

एव्हाना त्याच्या शैक्षणिक आणि तांत्रिक अनुभवामुळे त्याला अनेक मानाची पदं मिळू शकत होती पण सरतेशेवटी तो म्युनिकला स्थिरावला. बावरियन शासनाने त्याला म्युनिक विद्यापीठात ‘भौतिकशास्त्र’ विभागप्रमुखपद दिले. दरम्यानच्या काळात झुरिचच्या एका कॅफे मालकाची पुतणी असलेल्या ॲना बर्था लुडविग नावाच्या तरुणीसोबत तो विवाहबद्ध झाला. एका बाजूला हे गोडगुलाबी दिवस आणि दुसऱ्या बाजूला सोनेरी कारकिर्दीची सुरूवात असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता पण आयुष्यात सगळं असंच आलबेल असतं असं नाही. या दाम्पत्याला मुलबाळ झालं नाही शेवटी त्यांनी ॲनाचीच सहा वर्षीय भाची जोसेफिनला दत्तक घेतलं.

William Rantgen
सॅक्सोफोनची निर्मिती करणाऱ्या 'अडॉल्फ सॅक्स' यांची कहाणी

जोसेफिनमुळे त्याचं त्रिकोणी कुटूंब संपुर्ण झालं होतं. काम आणि कुटूंबासोबत काढलेल्या वार्षिक सहली छोटेमोठे ब्रेक असे सगळे मजेत सुरू होते आता सोबतीला त्याचा आवडता पेटी कॅमेराही आला होता. खरं तर त्याच्या कामापेक्षा त्याचे छंदच त्याच्या कारकिर्दीत महत्वाचे ठरले. एकदा त्याला त्याच्या लॅबमधला एक पुठ्ठा चमकतांना दिसला. ‘कॅथोड किरणांपासून लांब आहे त्यामुळं हे नसावं’ त्यानं विचार केला. ‘विकीरण प्रक्रियेमुळे पदार्थ चमकतो’ हे बघणारा तो काही एकमेव नव्हता किंबहुना त्याच्याकडं असलेली कॅथोड किरण नलिकाही ‘फिलीप लिनार्ड’ या भौतिकशास्रज्ञानं विकसित केली होती.

या सगळ्याच्या पाच वर्षे आधी अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ‘आर्थर गूडस्पीड’ याने छायाचित्रणाच्या प्लेटवर दोन नाणी ठेऊन त्यांची सावली टिपली होती. फिलीप आणि आर्थर यांनी प्रयोग केले होते पण याने ‘किरणांचं मुळ आणि त्याचे परिणाम’ याबद्दल सचित्र लेखच छापून आणला जो प्रचंड लोकप्रिय झाला. त्याने तब्बल सात आठवडे स्वत:ला अक्षरश: कोंडून घेत त्याचा सहाय्यक आणि बायकोपासूनही आपलं संशोधनकार्य गुपित ठेवले. ती त्याला फक्त जेवणावेळी टोकत असे. त्याचं संशोधनकार्य प्रकाशित झाले. या किरणांना त्यानं वेळीच काही न सुचल्यानं चला ‘क्ष’ मानुया म्हणत ‘क्ष-किरण’ नाव दिलं.

William Rantgen
पहिल्यांदाच सूक्ष्मजंतू व आदिजीवांचे निरीक्षण करणाऱ्या लेव्हेनहूक यांची कहाणी

हे क्ष-किरण म्हणजे एका प्रकारचे विद्युतचंबकीय विकीरणच. त्यांची तरंगलांबी साधारण ०.०१ ते १० नॅनोमीटर पर्यंत, वारंवारिता ही ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्साहर्ट्झ इतकी असते. ही तरंगलांबी गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनिल किरणांपेक्षा जास्त असते. त्यानं क्ष-किरणांचा शोध लावला असं मानलं जात असलं तरी क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून सुरु होतं. त्यानं हे सगळं व्यवस्थितपणे विस्तृत केलं. त्याच्या आधी जोहॉन हित्रोफ, इव्हान पुल्यूई, निकोला टेस्ला, फरर्नंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केलं होतं पण त्याच्या सखोल शास्रोक्त मांडणीमुळे वैद्यकशास्रात त्याच्या या अदृश्य तरीही पदार्थाच्या आरपार जाणाऱ्या या क्ष-किरणांचा उपयोग हाडांची प्रतिमा घेण्यास होऊ लागला.

निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा या क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते. सीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथं नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही जसं मेंदू. तिथं हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्या सहाय्याने मिळू शकते. ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात. त्याच्या या क्ष-किरणांचा फक्त वैद्यकिय उपयोगच होतो असं नाही. विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी स्फोटकांची तपासणीकरता ते वापरले जातात.

William Rantgen
वर्ल्ड फेमस ‘डनलप टायर्स’ बनवणाऱ्या डनलप भाऊंची कहाणी

अंतराळ संशोधनात क्ष-किरण छायाचित्र तंत्राद्वारे संशोधन केलं जातं तर औद्योगिक क्षेत्रात मुख्यतः धातूंचे जोडांतील छिद्रे शोधण्यासाठी क्ष-किरण वापरली जातात. अर्थात ‘मेडिकल मिरॅकल’ म्हणून प्रचंड लोकप्रिय ठरलेले हे क्ष-किरण हे प्रचंड फायदेशीर असते तरी अगदीच निरुपद्रवी आहेत असं नाही त्याबद्दल पुन्हा कधीतरी. तुर्तास ‘निदान तंत्रज्ञान’ क्षेत्रात क्रांती करणाऱ्या या क्ष-किरणांच्या शोधकर्त्यास अर्थातच ‘विल्यम रॉंटजेन’यांना विनम्र अभिवादन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com