पहिल्यांदाच सूक्ष्मजंतू व आदिजीवांचे निरीक्षण करणाऱ्या लेव्हेनहूक यांची कहाणी

स्वत:चा पहिला साधा सूक्ष्मदर्शक भिंग बनवला
Leeuwenhoek
Leeuwenhoekesakal
Summary

कापडाची गुणवत्ता तपासण्यासाठी दुकानदार वापरत असलेल्या काचांची कल्पना विकसित करून त्याने स्वत:चा पहिला साधा सूक्ष्मदर्शक म्हणजेच बृहत्दर्शक भिंग बनवला.

विज्ञानविश्वात औपचारिक शिक्षण घेऊन वैज्ञानिक बनलेल्या लोकांपेक्षा उपजत जिज्ञासू वृत्ती-कुतूहल-ज्ञानलालसा-प्रयोगशीलता अंगी असणाऱ्या मंडळींनी मानवी आयुष्याला अधिक जवळून स्पर्श केला. आज याच श्रेणीतल्या एका संशोधकाची गोष्ट सांगतो. त्याचा जन्म नेदर्लंड देशातल्या डेल्फ्ट येथील आहे. वयाच्या सातव्या वर्षीच पितृछत्र हरवल्यानं त्याला फारसे शिक्षण घेता आले नाही. १६४८ ला उपजिविकेसाठी तो ॲम्स्टरडॅमला रवाना झाला आणि त्यांनी तिथे कापडाच्या दुकानात मदतनीस म्हणून नोकरी पकडली. इथे त्याने 'भिंग' हा प्रकार पहिल्यांदाच बघितला. व्यापारी मंडळी कापडाची वीण आणि पोत तपासण्यासाठी भिंगाचा वापर करत.

चार वर्षे कापड व्यापाऱ्यातील बारकावे शिकत १६५२ ला तो पुन्हा आपल्या जन्मगावी परतला आणि त्याने तिथे आपला स्वत:चा कापड व्यवसाय सुरू केला. आठेक वर्षे या व्यवसायात जम बसवल्यानंतर त्याला १६६० ला स्थानिक नगरपालिकेत नोकरीची संधी मिळाली. सुरक्षित पर्याय म्हणून त्याने नोकरी स्वीकारली आणि इमानेइतबारे काम करत १६७७ ला त्याला प्रमुख अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्याची वयाची चाळीशी आली होती, रोजीरोटीच्या रेट्यात आजपर्यंत विज्ञानाशी तसा संबंधही आला नव्हता, पण या नोकरीमुळे त्याला आर्थिक सुरक्षिततेसोबतच स्थैर्यही लाभलं होते.

Leeuwenhoek
वर्ल्ड फेमस ‘डनलप टायर्स’ बनवणाऱ्या डनलप भाऊंची कहाणी

कापडाची गुणवत्ता तपासण्यासाठी दुकानदार वापरत असलेल्या काचांची कल्पना विकसित करून त्याने स्वत:चा पहिला साधा सूक्ष्मदर्शक म्हणजेच बृहत्दर्शक भिंग बनवला. हा भिंग बनवण्यासाठी त्याने काचेचा गोळा घासून सूक्ष्म भिंग तयार केले आणि ते भोकं (होल) पाडलेल्या धातूच्या दोन लहान पट्टिकात बसवत याला तीन प्रतलात फिरू शकेल असा निरीक्षक जोडला. या जुगाडमुळे त्याला भिंग बनवायचा नादच लागला. त्याने जवळपास साडेपाचशे भिंगं बनवली पण ती तयार करण्याचे तंत्र मात्र गुप्त ठेवलं. त्यानं बनवलेल्या या भिंगांची विवर्धनक्षमता जवळपास ३० ते ३०० पर्यंत होती. यांपैकी बहुतेक भिंगं आकाराने अत्यंत लहान आणि अतिशय कमी केंद्रांतराची होती. त्याचे प्रयोग आणि अभ्यास रूढार्थानं वैज्ञानिक नसले तरी काळजीपूर्वक निरीक्षण करण्याच्या त्यांच्या असामान्य क्षमतेमुळं पुढे अनेक मूलभूत शोध लावणे शक्य झाले.

१६७४ ला या भिंगातून त्याने पावसाचे-डबक्यातले-विहिरीतले पाणी अभ्यासत वेगवेगळ्या सूक्ष्मजंतू-आदिजीवांचं निरीक्षण करत वर्गीकरण केले आणि या सजीवांना नाव दिलं ‘ॲनिमलक्यूल्स’ अर्थात अत्यंत लहान सूक्ष्म प्राणी. १६७७ ला त्याने विविध किटक-कुत्रा आणि माणूस यांच्या शुक्राणूंचंही निरिक्षण आणि वर्णन केले. विज्ञानविश्वात इतके सुक्ष्म निरिक्षण पहिल्यांदाच कुणीतरी केले होते. त्याने डोळ्याच्या भिंगाची संरचना-स्नायूंतील आडव्या रेषा-किटकांचे मुखभाग-वनस्पतींची सूक्ष्म संरचना यांचा अभ्यास केला. मार्चेल्लो मालपीगी यांनी केशिका अर्थात सूक्ष्म रक्तवाहिन्यातल्या रक्ताभिसरणाचा शोध १६६१ ला लावला होता, पण याने १६८४ ला यावर स्वतंत्र अभ्यास केला. रक्ताचे सूक्ष्म अभिसरण आणि रोहिण्या-नीला यातील केशिका जोडणी यांचे त्याने केलेले निरीक्षण हे शरीरक्रियाविज्ञानातले एक अत्यंत महत्त्वाचे कार्य.

त्याने रक्तातल्या तांबड्या कोशिकांचे वर्णन केले आणि पक्षी-मासे-बेडूक यांच्या रक्तातल्या तांबड्या कोशिका या अंडगोलाकार असतात तर मानव आणि इतर सस्तन प्राण्यांच्या रक्तातील कोशिका वर्तुळाकार असतात असे सप्रमाण दाखवून दिले. विविध किटकांसोबतच कोळ्यांच्या जाळ्याचे धागे त्याचे विष निर्माण करणारे अवयव यांचेही त्याने काळजीपूर्वक निरीक्षण केले. त्याने वनस्पतींच्या ऊतकांतील अर्थात समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतील संकेंद्री स्टार्च कणांचे आणि एकदलिकित-द्विदलिकित वनस्पतींच्या खोडांच्या भागांचंही निरीक्षण केले.

Leeuwenhoek
फक्त 20 सेकंद मोकळ्या वातावरणात राहिलेल्या 'बबल बॉय' डेव्हिडची कहाणी

१६८९ ला ‘यीस्ट’ हे सूक्ष्म गोलाकार कणांचे बनलेले असते अशी नोंद करत डोळा-त्वचा-दात-स्नायू यांच्या सूक्ष्मदर्शकीय संरचनेचे त्याने उत्तम वर्णन केले. अनेक किटकांच्या वैशिष्ट्यांकडे आणि त्यांच्या वनस्पतींवर होणाऱ्या त्यांच्या अपायकारक परिणामांकडे त्याने लक्ष वेधून घेत त्यांच्या अनिषेकजननाचा अर्थात शुक्राणू अन् अंडे यांचा संयोग न होता होणाऱ्या प्रजोत्पादनाचा शोध लावला. गोड्या पाण्यातल्या रोटिफर-हायड्रा-व्हॉल्व्हॉक्स या सूक्ष्म प्राण्यांचंही त्याने वर्णन लिहिले. १७०२ साली रोटिफरांसंबंधी लिहिताना, "हे सूक्ष्म प्राणी पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात-गटारातून येणाऱ्या पाण्यात आणि इतर सर्व प्रकारच्या पाण्यात आढळतात कारण हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांबरोबर ते वाहून नेले जाऊ शकतात." अशी मांडणी केली.

निम्नदर्जाच्या विविध प्राण्यांच्या जीवनक्रमासंबंधी त्याने केलेले संशोधन हे "प्राणी उत्स्फूर्तपणे निर्माण होणे वा कुजलेल्या पदार्थांपासून त्यांची निपज करणे शक्य आहे" या तत्कालिन प्रचलित सिद्धांताच्या विरोधी होते. गव्हाच्या साठवणीतील 'टोके' किडे गव्हापासून तसेच गव्हात उत्पन्न होतात असा समज होता, पण हे किडे म्हणजे प्रत्यक्षात पंखयुक्त कीटकांनी घातलेल्या अंड्यांपासून तयार झालेले डिंभक अर्थात मऊ जाड अळ्या असतात, असे त्याने दाखवून दिले. पिसवांच्या संरचनेचे आणि त्यांच्या संपूर्ण जीवनातील रूपांतरणाचे वर्णन करून त्याने पिसवा या वाळू-धूळ इत्यादींपासून तयार होणारे सूक्ष्म व तिरस्करणीय जीव आहेत हे धादांत चुकीचे मत आहे असे दाखवले. कोणत्याही मोठ्या प्राण्याप्रमाणेच पिसवांत अनुरूप परिपूर्णता आहे व पंखयुक्त कीटकांच्या नेहमीच्या मार्गानेच त्यांची निपज होते हे त्याने सप्रमाण सिद्ध केले.

याच प्रकारे त्याने मुंगी-ईल तसेच खाऱ्या-गोड्या पाण्यातल्या प्राण्यांच्या जीवनक्रमाचाही त्याने काळजीपूर्वक अभ्यास केला आणि स्वयंजननाचा सिद्धांत चुकीचा असल्याचे दाखवून दिले. त्याने एका मित्राद्वारे लंडनच्या रॉयल सोसायटीशी संपर्क साधला आणि १६७३ ते १७२३ या काळात अनौपचारिक पत्रांमधून त्याने आपले बहुतेक निरिक्षण-संशोधनं या संस्थेला कळवले. त्याचं प्रचंड काम बघून या १६८० ला या संस्थेत ‘सदस्य’ म्हणून त्याची निवड झाली.

या संस्थेच्या ‘फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स’या प्रकाशनात त्याचे बहुतेक शोध ३७५ पत्रांद्वारे प्रसिद्ध झाले. सूक्ष्मजंतूचं पहिले प्रतिरूप १६८३ सालच्या प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या त्यानं रेखाटलेल्या रेखाचित्रात आढळते. १६९९ ला तो पत्रव्यवहाराद्वारे पॅरिस ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस’चाही सदस्य झाला. संस्थेच्या संस्मरणिकेत त्याची जवळपास २७ पत्रे प्रसिद्ध झाली. त्यांच्या आयुष्यातच त्याचे हे सगळे कार्य एकत्रित स्वरूपात डच आणि लॅटिन भाषेत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही निवडक काम इंग्रजीतही भाषांतरीत झाले.

Leeuwenhoek
नोबेल, पद्मविभूषण जिंकणारे हरित क्रांतीचे जनक माहितीयेत का?

त्याच्या या नाट्यपूर्ण संशोधनामुळे त्याचे जगभर नाव झाले. इंग्लंडची राणी-पीटर द ग्रेट यांसारख्या अनेक मान्यवर व्यक्तींनी त्याची भेट घेतली. प्रारंभी भिंगाने कापडाची वीण आणि पोत तपासणारा मदतनीस आता सन्माननिय संशोधक 'ॲंतॉन व्हान लेव्हेनहूक' या नावाने ओळखला जाऊ लागला.

त्याच्या संशोधनामुळे तत्कालीन ढोबळ समजांचे खंडन झाले आणि ‘सूक्ष्मजंतुविज्ञान-आदिजीवविज्ञान’ या शास्रांची पायाभरणी झाली.

संशोधन किंवा विज्ञानाची पार्श्वभूमी नसल्याने आधी ज्याची जाहीर थट्टा करण्यात आली त्या लेव्हेनहूकला रॉयल सोसायटीनं मानद सदस्यत्व दिले.

आपल्याला रॉयल सोसायटीनं ‘वैज्ञानिक’ मानलंय हे बघून लेव्हेनहूकचं समाधान झाले. वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांची बुद्धी तितकीच कुशाग्र होती. त्यांचे स्नायू अनैच्छिकरीत्या आखडले जाते. ही एक अत्यंत क्वचित आढळणारी व्याधी होती. यांचीही लक्षणं-निरीक्षणं त्यांनी रॉयल सोसायटीला नेमकेपणाने कळवली.

या नोंदी इतक्या नेमक्या आणि पद्धतशीर होत्या की या व्याधीला रॉयल सोसायटीनं ‘लेव्हेनहूक व्याधी’ हे नाव दिलं. यातच ‘डेल्फ्ट’ या ठिकाणी निधन झाले. यांचा 24 ऑक्टोबरला लेव्हेनहूक जन्मदिवस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com