व्हॉट्‌सऍपवर आता तासाभरानंतरही वापरा 'डिलीट फॉर एव्हरीवन' 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

"डिलीट फॉर एव्हरीवन' हे फिचर वापरताना त्यात अनेक त्रुटी होत्या. या सर्व त्रुटी नव्या अपडेटमध्ये काढून टाकण्याचा प्रयत्न व्हॉट्‌सऍपकडून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : "डिलीट फॉर एव्हरीवन' हे फिचर वापरून व्हॉट्‌सऍप मेसेज डिलीट करण्याची वेळ वाढवून आता 68 मिनिटे करण्यात आली आहे. त्यामुळे "डिलीट फॉर एव्हरीवन' या फिचरचा वापर व्हॉट्‌सऍप यूजर्स एका तासापेक्षा अधिक वेळाने करू शकणार आहेत. हे अपडेट लवकरच भारतात उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

"डिलीट फॉर एव्हरीवन' हे फिचर वापरून कुठलाही मेसेज सात मिनिटांमध्ये डिलीट करण्याची सुविधा व्हॉट्‌सऍपकडून मागील वर्षी नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली होती. "डिलीट फॉर एव्हरीवन' हे फिचर प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्‌सऍपवर पाठविलेला कुठलाही मेसेज 420 सेकंद किंवा सात मिनिटांच्या कालावधीपर्यंत डिलीट करण्याची सोय उपलब्ध झाली होती. आता ही वेळ वाढविण्यात आली असून, व्हॉट्‌सऍप अँड्रॉईड बिटा व्हर्जन 2.18.69 मध्ये हे अपडेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वसामान्य यूजर्ससाठी लवकरच हे अपडेट उपलब्ध होणार आहे. 

व्हॉट्‌सऍपवरील कुठलाही मेसेज आता सुमारे 68 मिनिटांपर्यंत डिलीट करता येऊ शकणार आहे. सध्या मेसेज पाठविल्यानंतर "डिलीट फॉर एव्हरीवन' हा पर्याय फक्त सात मिनिटांसाठी वापरता येतो. मात्र, नव्या अपडेटमध्ये सात मिनिटांची वेळ वाढवून एक तास आणि आठ मिनिटे एवढी करण्यात आली आहे. फक्त भारतातील व्हॉट्‌सऍप यूजर्सना त्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे वृत्त "डब्ल्यूएबिटाइन्फो' या संकेतस्थळाने दिले आहे. या बदलांबरोबरच नवे स्टिकर्सचे फिचरही व्हॉट्‌सऍपकडून उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यावर सध्या काम सुरू असल्याचे समजते. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करण्याचा पर्यायही लवकरच भारतात उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

"डिलीट फॉर एव्हरीवन' हे फिचर वापरताना त्यात अनेक त्रुटी होत्या. या सर्व त्रुटी नव्या अपडेटमध्ये काढून टाकण्याचा प्रयत्न व्हॉट्‌सऍपकडून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

आकडेवारी 
व्हॉट्‌सऍपचा भारतातील पसारा 
--- 
20 कोटी 
ऍक्‍टिव्ह यूजर्स 
--- 
60 अब्ज 
प्रतिदिन पाठविले जाणारे मेसेजेस 
--- 
10 भारतीय भाषा 
व्हॉट्‌सऍपची सेवा उपलब्ध 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: technology news whatsapp delete option