‘तंत्र’ज्ञानाची बाराखडी...

रवींद्र खैरे
सोमवार, 10 जुलै 2017

झपाट्याने बदलत जाणारे संदर्भ व माहिती केवळ एकाच पुस्तकात मिळणे अवघड असते. अभ्यासाचा आवाका पाहता संदर्भाच्या मूळ व अस्सल स्रोतापर्यंत जाण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालात प्रवेश करणे हाच उपाय आहे. वेळेचा दुरुपयोग होतो म्हणून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यास आपण आऊटडेटेड होण्याचाच धोका अधिक आहे.

झपाट्याने बदलत जाणारे संदर्भ व माहिती केवळ एकाच पुस्तकात मिळणे अवघड असते. अभ्यासाचा आवाका पाहता संदर्भाच्या मूळ व अस्सल स्रोतापर्यंत जाण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालात प्रवेश करणे हाच उपाय आहे. वेळेचा दुरुपयोग होतो म्हणून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यास आपण आऊटडेटेड होण्याचाच धोका अधिक आहे.

भ्यासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येतो, हे अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मुलाखतीतून वेळोवेळी सांगितले आहे; पण बहुतांश विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानाच्या विविध साधनांपासून अलिप्त राहणेच पसंत करतात. केवळ बाजारात उपलब्ध असलेल्या पुस्तकाकडे व संदर्भ साहित्याकडे आपल्या स्वप्नांना हवाली करून वर्षानुवर्षे चांगल्या निकालाची वाट पाहत बसतात. 

ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या साधनाची पुरेशी ओळख नसल्याने त्यांची सर्व मदार पारंपरिक साधनावर अधिक असते. काहींना जुन्या पद्धती वापरून यश मिळेलही; पण जगात क्षणाक्षणाला ज्ञानाचा स्फोट होत असताना स्वतःला नेहमी अपडेट ठेवणे ही काळाची गरज आहे. 

नव्या तंत्रज्ञानाची बाराखडी यासाठीच शिकायला हवी. नवनव्या दृकश्राव्य माध्यमापासून ते इंटरनेटच्या मायाजालापर्यंत सर्व साधनांची माहिती मिळवणे व त्याचा सर्वांगीण विकासासाठी खुबीने वापर करून घेणे हेच यशाचे नवे परिमाण झाले आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर :
इंटरनेट, रेडिओ, टीव्ही, सोशल माध्यमे, वेब पोर्टल, विविध ब्लॉग स्पॉट या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती, संदर्भ गरजेच्या वेळी मिळवता येतात. आपल्याकडील माहितीचे पृथःकरण करता येते. मागील अनेक वर्षाच्या प्रश्‍नपत्रिका सहज मिळू शकतात. आयोगाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचना, बदल पाहता येतात. आपल्यासारख्याच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन ग्रुप तयार करून विचारांची देवाणघेवाण करता येते. अनेक ऑनलाइन कोर्सेस करता येतात. याशिवाय अनेक कारणांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आपण करू शकतो. काही वर्षांपूर्वी ही सेवा अत्यंत महाग होती; पण आज हातातल्या स्मार्ट फोनवरही या सर्व सुविधा अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होतात. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. बरेच जण तासन्‌ तास वायफळ गप्पा, गेम, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे अशा कामासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतात. यात थोडा बदल करून मोबाईलचा वापर आपण केलेला अभ्यास, आपल्या आवाजात रेकॉर्ड करणे, ते रेकॉर्डिंग वेळोवेळी ऐकणे, अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या पीडीएफ फाईल मिळवणे, जेव्हा आपल्याला रिकामा वेळ असतो तेव्हा त्याचे वाचन करणे यासाठी करू शकतो. रेडिओ, टीव्ही याप्रसार माध्यमातून मिळणाऱ्या बातम्या काळजीपूर्वक ऐकल्यास चालू घडामोडीच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला सहज मिळतात. या माध्यमातून होणारी भाषणे, टॉक शो यामधून अनेक संदर्भ सहज हाती येऊ शकतात. छोट्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक राष्ट्रीय पातळीवरची वर्तमानपत्रे वाचायला मिळत नाहीत. जर इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांना करता आला तर देश तसेच विदेशातीलही वर्तमानपत्रे घर बसल्या वाचता येतात. वेळीच या माध्यमाचे महत्त्व ओळखून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान हाताळण्याचे हे विशेष कौशल्य आत्मसात केलेच पाहिजे. जर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकलो तर अभ्यासाची अपेक्षित गती आपल्याला राखता येणार नाही. कारण थोरामोठ्यांनी म्हटलंय ‘दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’.

ही काळजी घेऊया
- माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने अत्यंत स्मार्ट अभ्यास करता येत असला तरी ही माध्यमे वापरताना ही काळजी घ्यायलाच हवी.
- तंत्रज्ञानाची सर्व माध्यमे ही माणसाच्या मन व मेंदूवर पटकन प्रभाव पाडतात. त्यामुळे या माध्यमाचे व्यसन लागू नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी दिवसातील ठराविक वेळीच याचा वापर करण्याचा दंडक स्वतःला लावून घ्यावा.
- संगणकाच्या मायाजालात पटकन हवी ती माहिती आपल्याला मिळते; पण मिळालेली माहिती पडताळून पाहावी लागेल. कारण बऱ्याच वेळा चुकीची माहितीही मिळण्याची शक्‍यता असते.
- टीव्हीवरचे टॉक शो आपणाला समस्येकडे पाहण्याची दृष्टी देत असतात; पण ज्या शोमध्ये फक्त वितंडवाद असतो असे न पाहिलेले बरे. 
- काही काळजी घेऊन जर या माध्यमाचा वापर करायला आपण शिकलात तर याचे फायदेच अधिक वाट्याला येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: technology rhymes