Casimir Funk | 'व्हिटॅमिन्स'चा शोध लावणाऱ्या कॅसिमिर फंक यांची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हिटॅमिन्स चा शोध लावणाऱ्या कॅसिमिर फंक यांची कहाणी

कोविडसारख्या भयंकर पॅंडेमिकमध्येही ‘व्हिटमिन’नं बजावलेली भूमिका बघता कॅसिमिर याचं योगदान किती मौल्यवान आहे याची खात्री पटते.

'व्हिटॅमिन्स'चा शोध लावणाऱ्या कॅसिमिर फंक यांची कहाणी

गेल्या वर्षी ‘कोविड’ आला अन् या अनुषंगाने अनेक चर्चांना उधाण आले. इम्युनिटीची हार्ड इम्युनिटी झाली, कोमट पाण्याची वाफ झाली, आयसोलेशनचं क्वारंटिन झाले, जनता कर्फ्यूचं लॉकडाऊन झाले आणि फर्स्ट वेव्हची सेकंड वेव्हही झाली. इथपर्यंत अनेक संज्ञा आल्या, बदलल्या अन् गेल्याही पण एकुणच या कोविड कालावधीत ‘सी आणि झिंक’ यांच्या उपयुक्ततेच्या अनुषंगानं ‘व्हिटमिन’ या शब्दाची पहिल्या दिवसापासून चर्चा होती, आहे आणि अगदी उद्या कदाचित कोविड 20 आला तरीही राहील. आज या व्हिटमिनच्या इतिहासाचीच गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे या इतिहासामागे असलेल्या त्याची. ‘कॅझिमीर्झ फंक’ हे खरं तर त्याचं नाव, पण कॅझिमीर्झचा अपभ्रंश होत होत ते ‘कॅसिमिर’ असं झालं. कॅसिमिरचा जन्म पोलंडमधील ‘वर्साव’ इथला.

वयाच्या चौदाव्या वर्षी कॅसिमिरला रोगनिदानशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र या विषयांनी अगदी झपाटून टाकलं पण या ‘कलंदर’ माणसाला फक्त पुस्तकी अभ्यास करायचा नव्हता तर फिरायचं होतं-अनुभव घ्यायचे होते आणि यातून शिकायचं होतं-शिकत रहायचं होते. अभ्यासासाठी जिनिवाला रवाना होत तिथं तो तिनेक वर्षे रसायनशास्त्र शिकला. हळूहळू त्याला मानवी शरीर आणि त्यातल्या रासायनिक प्रक्रियांबद्दल जिज्ञासा वाटू लागली. त्यानं गॅब्रिएल बर्ट्रांड यांच्यासह ‘पाश्चर’ संस्थेत शरीरातल्या ‘अभाव असलेल्या घटकांबद्दल’ संशोधन करत दोन वर्षांनी आपला मुक्काम बर्लिनला हलवला. बर्लिन हे शहर म्हणजे त्याकाळी संशोधकांची ‘पंढरी’ होती. तिथं नोबेल पारितोषिक विजेते ‘एमिल फिशर’ यांच्या सानिध्यात त्याने प्रथिनांचा अभ्यास केला. तिथल्या स्थानिक आरोग्य विभागात काही काळ संशोधनाभिमुख काम केल्यानंतर आता पुनःश्च वेळ होती मुक्काम हलवण्याची.

हेही वाचा: अणु संरचनेचा शोध लावणारे भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर यांची कहाणी

कॅसिमिर ‘लिस्टर’ या संस्थेत काम करावं म्हणून थेट लंडनला रवाना झाला. तिथल्या ‘चार्ल्स मार्टीन’ यांच्यासोबत अनुभवांची देवाणघेवाण सुरू असतांना दोघं एका निष्कर्षापर्यंत पोहोचले ते म्हणजे “जे लोकं आहारात पॉलिश केलेला तांदूळ वापरतात त्यांचात ‘बेरीबेरी’ हा आजार जास्त आढळतो.” यावर कॅसिमिरनं अनेक प्रयोग केले-निरिक्षणं मांडले यातून “आजार तांदूळ पॉलिश केल्यानं नव्हे तर या प्रक्रियेदरम्यान त्यातली पोषकद्रव्ये हरवल्यानं होतो” हे सिद्ध झालं. कॅसिमिरनं आजारी कबुतरांवरही पोषणशास्राच्या अंगानं अनेक प्रयोग केले. तसं कॅसिमिरच्या आधीही सतराव्या शतकात आहारातील पोषणघटकांबद्दल चर्चा झाल्या होत्या. ‘संतुलित पोषक आहार’ हे औषधांसारखं काम करते यावर पूर्वी एकमतही झालं होते.

स्कॉटिश डॉक्टर जेम्स लिंडने नाविक मंडळींना ग्रासणाऱ्या हिरड्यांच्या आजारावर म्हणजेच स्कर्व्हीवर सर्वेक्षण आणि प्रयोग केले होते. ज्यात बोटीवर अनेक दिवस ताजी फळं उपलब्ध न झाल्याने असे झाल्याचे त्याने नमुद करून ठेवले होते. विज्ञानविश्वात ‘असं-तसं, जर-तर’ या गृहितकांना थारा नसतो. लिंडनं या ‘स्कर्व्हीबाधित’ नाविकांचे दोन गट केले, ज्यात एका गटाला नियमित जेवणासोबतच दोन संत्रे आणि एक लिंबू देण्याची व्यवस्था केली.

हेही वाचा: 'रिहॅबिलिटेशन मेडिसिन’ विकसित करणाऱ्या डॉ. रस्क यांची कहाणी

ज्यांच्या आहारात फळांचे नियोजन केले होते त्यांच्यातली स्कर्व्हीची लक्षणे हळूहळू कमी झालेली आढळली. याउलट नियमित आणि त्याहून चांगला आहार असूनही दुसऱ्या गटातल्या नाविकांमधील स्कर्व्हीची लक्षणं अजूनच बळावलेली आढळली. लिंड ‘आहारात लिंबूवर्गीय फळांच्या सेवनानं स्कर्व्ही बरा होतो’ या निष्कर्षाप्रत पोहोचला. कॅसिमिरनं हाच धागा पुढं पकडून बेरीबेरी, पेलग्रा या आजार आणि तद्नुषंगाने जीवनसत्वयुक्त आहार याबद्दल मांडणी केली.

त्यानं ‘लॅन्सेट’ या प्रतिष्ठित ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये त्याच्या या सर्व अनुभवांवर एक संशोधनात्मक लेख लिहिला. याच लेखात त्यानं जीवनसत्वांचा उल्लेख गरजेची पोषणतत्वे अर्थात ‘व्हायटल अमाईन्स’ असा केला. हा लेख बराच गाजला, त्यावर चर्चा झाली तो इतर अंकातही अनेकदा पुनर्प्रकाशित करण्यात आला. यासंदर्भानं कॅसिमिरनं अनेक सदर-लेख लिहिले याच साखळीतल्या ‘जर्नल ऑफ स्टेट मेडिसिन’ या नियतकालिकातल्या लेखात त्यानं ‘व्हायटल अमाईन्स’ ही संज्ञा ‘व्हिटमिन्स’ अशी संक्षेपित करून वापरली. वैद्यकशास्त्रात ‘व्हिटमिन्स’ या घटकावर शास्रीय संशोधन-चर्चा सुरू झाल्या. निरोगी शरीरासाठी व्हिटमिनयुक्त घटक आहारात असणे अत्यावश्यक आहे यावर शिक्कामोर्तब झालं.

हेही वाचा: जेनेटिक कोडवर विशेष संशोधन करणाऱ्या 'डॉ. हरगोविंद खुराणा' यांची कहाणी

आहारशास्र-पोषणशास्त्र या उपशाखांसोबत ‘व्हिटमिन थेरपी’चा उदयही झाला. कॅसिमिरनं स्वानुभवातून वेगवेगळ्या व्हिटमिन्स अभावी होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचं वर्गीकरण केले. या सगळ्या प्रयोगातून त्यानं बेरीबेरी प्रतिरोधक, स्कर्व्ही प्रतिरोधक, पेलग्रा प्रतिरोधक आणि रिकेट्स प्रतिरोधक अशी चार व्हिटमिन्स असल्याचे प्रतिपादन करणारा लेख लिहिला. त्याच्या लेखांची-संशोधनपत्रिकांची पुस्तकं निघाली त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या आणि कॅसिमिरची त्याच्या जन्मगावी म्हणजे ‘वर्साव’ इथं अधिकारी म्हणून नेमणूक झाली. इथं त्याने विस्मृतीसारखे मनोविकारही पोषणद्रव्यांच्या अभावाने होऊ शकतात असे सप्रमाण सिद्ध केले आणि हॅरी डबिन यांच्यासोबत नैसर्गिक स्त्रोतापासून बनलेले व्हिटमिन अ आणि ड औषधांच्या रुपानं बाजारात लॉंचही केलं.

कॅसिमिरनं मानवसमुहाला काय दिलं?

-पोषणमुल्य, आहारशास्त्र याबाबत शिक्षित केलं.

-आरोग्याकडं बघण्याचा क्रांतीकारक दृष्टिकोन दिला.

-रक्तक्षयापासून कर्करोगापर्यंत अनेक आजारात ‘आहार’ या बाबीचा प्रतिरोधक असो वा रोगनिवारक अश्या अनेक अंगांनी विचार करायला भाग पाडलं.

-आहारातील छोटे छोटे घटक निरोगी शरीरासाठी महत्वाचे असतात याची जाणीव करून दिली.

हेही वाचा: सॅक्सोफोनची निर्मिती करणाऱ्या 'अडॉल्फ सॅक्स' यांची कहाणी

आज वाढतं वजन-मधुमेह-हृदयरोग-कर्करोग या आजारांचे वाढलेले प्रमाण लक्ष्यात घेता ‘बदललेली जीवनशैली आणि पोषणमुल्य हरवलेली आहारपद्धती’ हे जेव्हा दिसतं तेव्हा कॅसिमिरची निरिक्षणे अजूनच महत्वाची वाटतात. आधुनिक समाजजीवनात ‘शाश्वत आरोग्य’ या संकल्पनेचा विचार केल्यास आणि कोविडसारख्या भयंकर पॅंडेमिकमध्येही ‘व्हिटमिन’नं बजावलेली भूमिका बघता कॅसिमिरचं योगदान किती मौल्यवान आहे याची खात्री पटते.

loading image
go to top