नभांगणात अनुभवा आज अन् उद्या उल्कावर्षावाची मनोहारी रोषणाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

सोमवारी व मंगळवारी ( ता.  २२ व २३) होणारा उल्कावर्षाव पाहण्यास विसरू नका. हा नैसर्गिक खगोलीय  नजारा नक्कीच तुमचा आनंद द्विगुणीत करेल. या रात्री वीणा तारका समूहातून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळेल.

सोमवारी व मंगळवारी ( ता.  २२ व २३) होणारा उल्कावर्षाव पाहण्यास विसरू नका. हा नैसर्गिक खगोलीय  नजारा नक्कीच तुमचा आनंद द्विगुणीत करेल. या रात्री वीणा तारका समूहातून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळेल.

मध्यरात्री बाराच्या सुमारास ईशान्येच्या क्षितिजावर वीणा तारका समूह दाखल होईल.  अभिजित या ठसठशीत निळसर तेजस्वी ताऱ्यामुळे हा तारका समूह सहज ओळखू येतो. आकाशाच्या या भागातून उल्का पडतील. चंद्राच्या प्रकाशाने उल्कादर्शनात व्यत्यय येईल; मात्र तो मावळल्यावर पहाटे चारनंतर उल्कावर्षाव अधिक चांगला दिसेल. ताशी सरासरी वीस उल्का पडतील.  

सी- १८३१ या धुमकेतूच्या आगमनामुळे उल्कावर्षाव घडतो. यापुर्वी १८६१ साली दिसलेला हा धुमकेतू त्याच्या प्रदीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ४१५ वर्षांतून एकदा सूर्यप्रदक्षिणा पुर्ण करतो. त्याच्या शेपटीतून सांडलेल्या कचऱ्यामुळे १६ ते २५ एप्रिल या काळात उल्कावर्षाव घडत राहातो. २२ व २३ तारखेला उल्कापाताचे प्रमाण जास्त असते.  

तो खुल्या डोळ्यांनी पाहता येईल. शहरातील दिव्यांच्या झगमगाटापासून दूर टेकडीवर किंवा मैदानावर सर्व आकाश व्यवस्थित दिसेल अशा काळोखाच्या ठिकाणी जमून तो पहावा. 
 धूमकेतू सूर्यमालेचेच घटक आहेत. सूर्यापासून पृथ्वीपर्यंतच्या अंतराच्या ५० हजार पट दूर उर्टच्या मेघामध्ये लाखोंच्या संख्येने ते वावरतात. कार्बन डायऑक्‍साईड वायू, बर्फ, दगडधोंडे आणि धुलीकणांनी बनतात. काही धूमकेतू सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात सापडून त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. सूर्याजवळ 
आल्यावर उष्णता आणि सौरवातामुळे  शेपट्या फुटतात. त्यातील कचरा मार्गावर सांडतो.  सूर्यप्रदक्षिणेवेळी पृथ्वी या कचऱ्याच्या भागातून जात असते तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो.

हे छोटेमोठे दगड, धुलीकण सेकंदाला ५०-६० किलोमीटर वेगाने वातावरणात घुसतात; घर्षणाने पेट घेऊन सुंदर प्रकाशशलाका निर्माण करतात आणि क्षणार्धात नष्ट होतात. त्याने निर्माण होणारी मनोहारी रोषणाई नभांगणात पहायला मिळेल. हा खगोलीय आविष्कार सर्वांनी अवश्‍य अनुभवावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today and tomorrow Meteor shower lightening in Sky