esakal | ट्विटरने सुरक्षाप्रमुखाच्या पदावर केली हॅकरची नेमणूक
sakal

बोलून बातमी शोधा

twitter

अलिकडच्या काळात बिटकॉईनसह काही घोटाळ्यांचा फटका बसल्यानंतर ट्विटरने सुरक्षा प्रमुख म्हणून एका हॅकरची नियुक्ती केली आहे.

ट्विटरने सुरक्षाप्रमुखाच्या पदावर केली हॅकरची नेमणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - अलिकडच्या काळात बिटकॉईनसह काही घोटाळ्यांचा फटका बसल्यानंतर ट्विटरने सुरक्षा प्रमुख म्हणून एका हॅकरची नियुक्ती केली आहे. पीटर झॅट्को असे त्यांचे नाव असून मज् नावाच्या हँडलमुळे त्यांची या क्षेत्रात जागतिक पातळीवर सर्वोत्तम हॅकर अशी प्रतिमा आहे.

अभियांत्रिकी पातळीवरील चुकीच्या उपायांपासून चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी ही नियुक्ती आहे. सुरक्षेच्या पातळीवर गंभीर भंग झाल्यामुळे नियमनाचा धोका वाढल्यामुळे ट्विटरने हे पाऊल उचलले आहे. झॅट्को ४५ ते ६० दिवस आढावा घेतील आणि मग महत्त्वाच्या सुरक्षा कार्यवाहीसाठी व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतील अशी अपेक्षा आहे.

झॅट्को यांच्याविषयी
स्ट्राईप या अमेरिकी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या सुरक्षेवर देखरेख करण्याचं काम झॅटको यांनी केलं आहे. तसंच गुगलसाठी विशेष प्रकल्पांचे संचलनही ते करतात. याशिवाय पेंटॅगॉनच्या डिफेन्स अॅडव्हान्सड् रिसर्च अँड प्रोजेक्ट एजन्सीच्या (डीएआरपीए) प्रकल्पांसाठी अनुदान देणाऱ्या समितीसाठी त्यांनी काम केलं आहे. 

सर्वस्व पणास लावू
या नियुक्तीमुळे झॅट्को प्रेरित झाले आहेत. त्यांनी ट्विटरच्याच माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, आता गोपनीय बाबी उजेडात येणार असे दिसते. ट्विटरच्या कार्यकारी चमूत सहभागी होण्यास मी आतुर आहे. सार्वजनिक संभाषणची न्याय्य पद्धतीने हाताळण्याच्या मोहिमेवर माझा खरोखरच विश्वास आहे. त्यासाठी मी सर्वस्व पणास लावेन.

बिटकॉईन घोटाळा
जुलैमध्ये ट्विटरला हँकींगचा जबरदस्त फटका बसला. राजकीय नेते, नामवंत व्यक्ती यांच्यासह मोठ्या कंपन्यांची ट्विटर अकाऊंट हॅक होऊन त्यांच्यावतीने लक्षावधी फॉलोअर्सना बिटकॉईनमध्ये दुप्पट करण्याचे आमिष दाखवण्यात आले. विशिष्ट क्रमांकावर बीटकॉईन पाठविल्यास त्या मोबदल्यात जास्त परतावा मिळेल असे सांगणारे ट्विट पोस्ट करण्यात आले. तेव्हाचे अध्यक्षीय निवडणूकीतील डेमोक्रॅटीक उमेदवार ज्यो बायडेन, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांची अकाऊंट तेव्हा हॅक झाली होती.

राजकीय पडसाद
काही वर्षांपूर्वी ट्विटरमध्ये काम करीत असताना दोन कर्मचाऱ्यांनी सौदी अरेबियासाठी हेरगिरी केल्याचा आरोप अमेरिकी सरकारने गेल्या वर्षी केला होता. सौदी राजघराण्याच्या टीकाकारांची वैयक्तिक माहिती पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.