
Ella Irwin Resign : ट्विटरला मोठा झटका! ट्रस्ट अँड सेफ्टी प्रमुख एला इरविन यांचा तडकाफडकी राजीनामा
ट्विटर कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन आणि पॉलिसीचं काम पाहणाऱ्या एला इरविन यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. ट्विटर आणि इलॉन मस्क या दोघांनाही हा मोठा झटका असल्याचं म्हटलं जातंय. एला या मस्क यांच्या अगदी विश्वासू व्यक्तींपैकी एक होत्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा का दिला याबाबत तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.
इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर कायम चर्चेत, किंवा वादात राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक डिलीट झालेले ट्विट पुन्हा दिसत असल्याची तक्रार करत होते. त्यामुळे ट्विटरच्या सुरक्षेबाबत प्रश्न व्यक्त केला जात आहे. अशातच एला यांनीही राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ट्रस्ट अँड सेफ्टी हेड
गेल्या वर्षी जूनमध्ये एला यांनी ट्रस्ट अँड सेफ्टी हेड म्हणून ट्विटर जॉईन केले होते. यापूर्वी या पदावर असणारे योईल रोथ यांनी राजीनामा दिल्यानंतर एला यांची निवड करण्यात आली होती. ट्विटरवरील चुकीची भाषा आणि हिंसक पोस्टबाबत पॉलिसी तयार करण्यात एला यांचा मोठा वाटा आहे. ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याबाबतचे नियम तयार करण्यातही एला यांचा सहभाग होता.
मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून ट्रस्ट अँड सेफ्टी पदावरून राजीनामा देणाऱ्या एला या दुसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी योईल रोथ यांनी नोव्हेंबर महिन्यात या पदावरून राजीनामा दिला होता. कंपनी सोडल्यानंतर त्यांनी मस्कवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.
मस्क यांच्या विश्वासू
एला या मस्क यांच्या मोजक्या विश्वासू लोकांपैकी एक होत्या. ट्विटरवरील कंटेंटबाबत मस्क यांचे निर्णय लागू करणे, त्यांच्या निर्णयांची पाठराखण करणे, ट्विटरवर जाहिरातदारांना परत आणणे अशा अनेक गोष्टींमध्ये एला यांनी मस्कची साथ दिली होती.
कारण अद्याप अस्पष्ट
राजीनाम्याचं वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर एला यांनी याबाबत पुष्टी केली. ब्लूमबर्ग आणि फॉर्च्युन अशा माध्यमांनी आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, एला यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.