...माहिती हाच विकास

प्रा. विश्राम ढोले,माध्यमतज्ज्ञ
Sunday, 29 October 2017

आपण नुकताच विकासात्मक माहिती दिन (ता. २४) साजरा केला. एरवी वर्षभर आणि क्षणोक्षणी ‘माहिती हाच विकास’ या दिशेने आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जगण्याची अपरिहार्य वाटचाल सुरू आहे.

ही गोष्ट १९७० ची. पंतप्रधान इंदिरा गांधीच्या निमंत्रणावरून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अर्थात ‘यूएनडीपी’चे एक शिष्टमंडळ भारतात आले होते. जनसंज्ञापनाच्या क्षेत्रातील अमेरिकी तज्ज्ञ विल्बर श्रॅम हे त्याचे अध्यक्ष. देशाच्या विकासामध्ये माहिती आणि माध्यमांचा वापर कसा करून घेता येईल याबाबत त्यांनी सरकारला सल्ला दिला. काही योजना सुचविल्या. त्यातूनच पुढे १९७५ मध्ये ‘साइट’ (SITE) हा एक आगळावेगळा प्रयोग सुरू करण्यात आला. ग्रामीण भागात विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी माहितीचे चलनवलन वाढले पाहिजे. त्यासाठी टीव्हीचा वापर कसा करता येईल हे पाहण्यासाठी हा प्रयोग होता. सरकारप्रणीत विकास कार्यक्रमांसाठी टीव्ही आणि रेडिओचा मोठ्या प्रमाणावर वापर करून घेण्याचे हेच धोरण पुढे अनेक वर्षे राबविले गेले. त्या धोरणाची काहीएक पायाभरणी या शिष्टमंडळाच्या भेटीत झाली होती.

साध्य ते साधन
कट टू-ऑगस्ट २०१७. इंदिरा गांधींचे नातू आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी केंब्रिज अँनालिटिका या बहुराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख भारतात आले. ‘डेटा ड्राइव्ह्‌ज ऑल वुई डू’ हे या कंपनीचे घोषवाक्‍य. लोकांची जी-जी माहिती जिथून-जिथून गोळा करता येईल ती करायची. त्या अफाट माहितीसाठ्याचे विश्‍लेषण करायचे. त्यावरून त्यांच्या वर्तनाचे भाकीत करायचे. इतकेच नव्हे, तर त्या वर्तनाला दिशा द्यायची हे या कंपनीचे काम. इंग्लंडमधील ब्रेक्‍झीटचे सार्वमत आणि अमेरिकेत ट्रम्प यांचा विजय ही कंपनीच्या यशाची दोन ठळक उदाहरणे. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारमोहिमेचे काम मिळविण्यासाठी केंब्रिजची ही भेट होती. केंब्रिजला काम मिळेल न मिळेल, पण लोकांची माहिती वापरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होणार, हे मात्र नक्की.  

पहिल्या घटनेत इंदिरा गांधी आहेत आणि दुसऱ्यात त्यांचे नातू, या पलीकडे या दोन घटनांमध्ये वरकरणी फार काही संबंध दिसणार नाही. पण जरा खरवडून पाहिले या दोन घटनांदरम्यान एक मोठा स्थित्यंतरवजा बदल दिसू शकेल. हे स्थित्यंतर आहे माहिती या घटकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये. लोकांच्या वर्तनाचा संबंध दोन्ही ठिकाणी आहे. पण पहिल्यामध्ये लोकांचे वर्तन बदलविण्यासाठी माहितीचा वापर करण्यावर भर आहे तर दुसऱ्यामध्ये लोकांच्या वर्तनाची माहिती मिळविण्यावर. एकाकडून (म्हणजे सरकार वा केंद्रवर्ती संस्थेकडून) हजारोंपर्यंत माहिती पोचविणे ही पहिल्या घटनेची दिशा आहे तर लाखो लोकांकडून सहस्रधारांनी वाहणारी माहिती वापर काही मूठभरांकडे वळवायची ही दुसऱ्या घटनेची. पहिल्या घटनेमध्ये माहितीचा दुष्काळ संपवायचा आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये माहितीच्या महापुरातून वाट काढायची आहे. पहिल्या घटनेमध्ये टीव्ही, रेडिओसारखी प्रसारमाध्यमे (मास मीडिया) कर्त्याच्या भूमिकेत आहेत, तर दुसरीमध्ये सोशल मीडियासह सारी डिजिटल व्यवस्था. पहिल्या घटनेमागे विकासासारखी सामाजिक प्रक्रिया गतिमान करणे हा उद्देश आहे तर व्यक्तीच्या वर्तनाला प्रभावित करणे हा दुसऱ्या घटनेचा. पहिल्यात माहिती हे फक्त एक साधन आहे. तर दुसऱ्यामध्ये ते जवळ जवळ साध्य बनले आहे.

माहितीचे महत्त्व
या दोन घटनांमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी दिसत असला, तरी त्या कोणत्याही पक्षाबाबत घडू शकल्या असत्या. दोन्ही घटना भारताशी संबंधित असल्या तरी टोकाचे वाटावे असे हे स्थित्यंतर कमी अधिक प्रमाणात इतरही देशांमध्ये पाहायला मिळू शकते. कारण माहिती हा घटक आता जगभर सगळ्याच सामाजिक आणि वैयक्तिक जगण्याच्या केंद्रस्थानी आलाय. या आधी माहितीला महत्त्व नव्हते असे नाही. माहिती निर्माण करणे, ती साठविण्याचे निरनिराळे प्रकार शोधणे, माहितीचा वापर करणे, तिच्यावर प्रक्रिया करणे या साऱ्यांचा इतिहास मानवाच्या इतिहासाइतकाच जुना आहे. पण माहितीचे प्रमाण, व्याप्ती, वेग, साठवणूक, माहितीच्या प्रवाहाच्या दिशा आणि महत्त्वाचे म्हणजे माहितीवर प्रक्रिया करून काही नवे शोधण्याची आपली क्षमता हे सगळे मर्यादित होते. त्यावर स्थळ-काळाची खूप बंधने होती. छपाई तंत्रज्ञान, टेलिग्राफ, टेलिफोन, ग्रामोफोन, कॅमेरे, सिनेमा, रेडिओ आणि टीव्ही यांसारखे एकेक तंत्रज्ञान येत गेले तसतशी ही बंधने कमी होत गेली. उपग्रहाधारित दळणवळणामुळे माहितीच्या प्रवाहासाठी अक्षरशः आभाळ मोकळे झाले. या बदलांचा अंदाज घेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९७२ मध्ये एक ठराव केला. संयुक्त राष्ट्र संघटनेचा स्थापना दिवस म्हणजे २४ ऑक्‍टोबर. तोच दिवस जागतिक विकासात्मक माहिती दिन म्हणून साजरा करावा असा हा ठराव होता. एका अर्थी माहिती नावाच्या घटकाला असलेले महत्त्वच या ठरावाने अधोरेखित केले होते. माहितीचे आदानप्रदान वाढले, विशेषतः युवकांमध्ये वाढले तर विकासाच्या मुद्द्यांबाबत जनजागृती व जनमत निर्मिती होईल व विकासाला चालना मिळेल असे या ठरावात म्हटले होते. भारतभेटीला आलेले विल्बर श्रॅम, डॅनियल लर्नर आदी मंडळीच्या मांडणीवरच संयुक्त राष्ट्रांचा हा ठराव बेतला होता. त्या वेळच्या परिस्थितीनुसार आणि संयुक्त राष्ट्राच्या धोरणानुसार मुख्यत्वे सामाजिक आर्थिक विकासाची एक पूर्वअट एवढ्यापुरतेच माहितीला महत्त्व देण्यात आले होते.

माहितीची उपयुक्तता
माहितीचा विकासाशी असलेला संबंध आता संपला आहे असे नाही. तसे कधी होणारही नाही. पण फक्त इतर कशाची तरी गरज म्हणून माहितीकडे बघण्याचे दिवस आता संपले. माहिती आता फक्त पूरक गरज नाही तर कारक गोष्ट आहे. कर्ता आणि धर्ता असे दोन्ही आहे असे मानले जात आहे. आणि त्याचा प्रत्यय यावा अशी असंख्य उदाहरणे आसपास दिसू लागली आहेत. आज जगातील सर्वांत बलाढ्य कंपन्या आणि सर्वाधिक श्रीमंत माणसांच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येईल, की त्यातील अनेक कंपन्यांचे उत्पादन वस्तू नाही तर फक्त माहिती आहे. बिल गेट्‌स, स्टीव्ह जॉब्स, वॉरेन बफे, मार्क झुकरबर्ग, जॅक मा या मंडळींनी वस्तू नाही तर कल्पना आणि माहितीच्या व्यवस्था निर्माण केल्या. अमेझॉन, अलिबाबा, फ्लिपकार्ट, उबर-ओला, पेटीएम या कंपन्या चालतात ते माहिती निर्माण करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे यातून. रिलायन्सचे जिओ किंवा इतर दूरसंचार कंपन्यांच्या सेवा वरकरणी आपल्याला फुकटात किंवा इतक्‍या स्वस्तात मिळू शकतात, कारण त्या मुख्यत्वे आपल्या जगण्याची माहिती गोळा करण्याच्या उद्योगात आहेत. इतकंच कशाला, वस्तुरूप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही ब्रॅंडच्या रूपाने माहिती निर्माण केल्याशिवाय आज तरणोपाय नाही.

माहितीचा कारखाना
आपल्या अगदी दैनंदिन जीवनातही आपण हरघडी वापरण्याजोगी माहिती तयार करीत चाललो आहोत. मोबाईल फोनचा वापर हे तर त्याचे सर्वांत मोठे अवकाश. पण क्रेडिट-डेबिट, आधार, पॅन वगैरे कार्डांचा आणि पासवर्डचा वापर, ऑनलाइन बुकिंग, खरेदी, इंटरनेटवरील ब्राउझिंग, जीपीएसचा वापर, सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरील आपला वावर या सगळ्या कृती म्हणजे साठवता येण्यासारखी, वापरता येण्यासारखी माहिती तयार करण्याचा आपला आपला अखंड चालणारा माहितीचा कारखाना. एका अर्थाने आपण आता फक्त मनुष्यप्राणी नाही राहिलो. माहितीशास्त्राचे एक तज्ज्ञ ल्युसियानो फ्लोरिडा यांचा शब्द वापरायचे तर ‘इन्फर्मेशन ऑर्गेनिझम इन्फॉर्ग’ अर्थात माहितीप्राणी झालो आहोत. आपण तसे आधीही होतोच. पण डिजिटल युगाने त्याचा अनुभव जवळ जवळ प्रत्येकाच्या आणि क्षणाक्षणाच्या पातळीवर आणलाय. हे स्थित्यंतर क्रांतिकारी आहे. त्याचे बरेवाईट असे अनेक परिणाम दिसू लागले आहेतच. अगदी नजीकच्या भविष्यात काय घडू शकेल याचाही अंदाज बांधणे कठीण व्हावे इतक्‍या प्रचंड वेगाने हे माहितीचे पर्यावरण बदलत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishram Dhole article