chandrayaan 2 : चंद्राच्या मातीत आढळले भारित कण 

वृत्तसंस्था
Saturday, 5 October 2019

chandrayaan 2 : 'चांद्रयान- 2' च्या ऑर्बिटरचे निरीक्षण; "इस्रो'कडून अभ्यास सुरू बंगळूर : चांद्रयान- 2 मोहिमेतील 'विक्रम लँडर'शी संपर्क साधण्यात अद्याप यश आले नसले, तरी या मोहिमेचाच भाग असलेला ऑर्बिटर मात्र चंद्राची महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवीत आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या या ऑर्बिटरवरील एका उपकरणाने चंद्रावरील मातीमध्ये भारित कण टिपले असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे. 

बंगळूर : चांद्रयान- 2 मोहिमेतील 'विक्रम लँडर'शी संपर्क साधण्यात अद्याप यश आले नसले, तरी या मोहिमेचाच भाग असलेला ऑर्बिटर मात्र चंद्राची महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवीत आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या या ऑर्बिटरवरील एका उपकरणाने चंद्रावरील मातीमध्ये भारित कण टिपले असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे. 

'चांद्रयान- 2 लार्ज एरिया एक्‍स-रे स्पेक्‍ट्रोमीटर' (क्‍लास) हे ऑर्बिटरवरील उपकरण चांद्रभूमीवरील विविध कणांचा अभ्यास करण्यासाठीच तयार केले आहे. या उपकरणाद्वारे सोडियम, कॅल्शिअम, ऍल्युमिनिअम, सिलिकॉन, टिटॅनिअम आणि लोह या धातूंच्या कणांच्या उपस्थितीची थेटपणे नोंद घेते. यासाठी हे उपकरण चंद्राकडून परावर्तित होणाऱ्या द्वितीय श्रेणीच्या क्ष किरणांचा वापर करते. सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या सौर वाऱ्यांमध्ये दर सेकंदाला काहीशे किलोमीटर वेगाने प्रवास करणारे भारित कण (प्लाझ्मा) असतात. पृथ्वीभोवतीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे या प्लाझ्मा कणांना अडथळा निर्माण होऊन पृथ्वीभोवती चुंबकीय आवरण तयार होते. यालाच मॅग्नेटोस्फिअर म्हणतात. या मॅग्नेटोस्फिअरची लांबी सूर्याच्या दिशेला केवळ 22 हजार किलोमीटर असली, तरी विरुद्ध दिशेला त्याचा आकार शेपटीसारखी लांब असतो, त्याला जिओटेल म्हणतात. 

पृथ्वीच्या परिभ्रमणादरम्यान या जिओटेलच्या टप्प्यात चंद्राचीही कक्षा येते. पौर्णिमेच्या आसपासच्या कालावधीत चंद्र तब्बल सहा दिवस या जिओटेलच्या कक्षेत असतो, त्यामुळेच यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील पौर्णिमेच्या कालावधीत 'क्‍लास'ने भारित कण आणि त्यांची कमी-अधिक तीव्रता टिपली. हे कण म्हणजे बहुधा इलेक्‍ट्रॉन असून त्यांची तीव्रता ही जिओटेलच्या बाहेरील भागापेक्षा दहा पटींनी वाढलेली असल्याचेही आढळून आले. या कणांचा अधिक अभ्यास सुरू असून भविष्यात चंद्राभोवतीच्या आवरणात "चुंबकीय क्षेत्राच्या तालावर होणाऱ्या इलेक्‍ट्रॉनच्या नृत्या'चे रहस्य लवकरच उलगडता येईल, असा विश्‍वास "इस्रो'ने व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weighted particles found in soil of moon

Tags
टॉपिकस
Topic Tags: