
Whatsapp Desktop Update Alert : जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीने चर्चेत आलं आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या Indian Computer Emergency Response Team (CERT-In) ने व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी गंभीर इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅप वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
CERT-In ने आपल्या अहवालात सांगितलं आहे की, व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉपवर सध्या एक गंभीर तांत्रिक त्रुटी आढळली आहे, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स वापरकर्त्यांच्या संगणकावर नियंत्रण मिळवू शकतात. विशेषतः 2.2450.6 या व्हर्जनपूर्वीच्या सर्व सीरिज या त्रुटीने प्रभावित आहेत. त्यामुळे हे व्हर्जन वापरणाऱ्यांना धोका अधिक आहे.
व्हॉट्सअॅप च्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये एक मोठी त्रुटी म्हणजे काही विशिष्ट फाइल्स ओपन करताना अॅप MIME प्रकार (MIME Type) आणि फाइल एक्स्टेन्शनमध्ये गोंधळ होतो. याचा फायदा हॅकर्स घेतात. ते अशा फाइल्स तयार करतात ज्या पाहायला सुरक्षित वाटतात, पण प्रत्यक्षात त्या घातक असतात. एकदा का वापरकर्त्याने अशी फाइल उघडली, की त्यांची खासगी माहिती लीक होऊ शकते किंवा अकाउंट हॅक होण्याचा धोका निर्माण होतो.
WhatsApp डेस्कटॉप अॅप तात्काळ अपडेट करावं.
2.2450.6 पेक्षा जुनी कोणतीही आवृत्ती वापरत असाल, तर ती बदलणं अत्यावश्यक आहे.
अनोळखी नंबरवरून आलेले मेसेजेस उघडू नयेत.
कोणत्याही अपरिचित लिंकवर क्लिक करू नये.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी अॅप नेहमी अपडेटेड ठेवावं.
अलीकडच्या काळात सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स हॅकर्ससाठी मोठं शस्त्र ठरत आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वापरकर्त्याने अधिक सावध राहणं गरजेचं आहे. एक क्षणाचं दुर्लक्षही मोठ्या आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसानीचं कारण ठरू शकतं.
आपल्या सुरक्षेसाठी व्हॉट्सअॅपचं डेस्कटॉप अॅप आजच अपडेट करा आणि सायबर हल्ल्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.