सावधान! व्हॉट्‌सऍप हॅकिंग वाढतेय 

अनिश पाटील
Wednesday, 12 April 2017

मुंबई - संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्‌सऍप हॅक करून खासगी माहिती चोरण्यास सुरवात केली आहे. या माहितीच्या आधारावर हॅक करण्यात आलेल्या खातेधारकाकडे खंडणी मागितली जाते. 

मुंबई - संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्‌सऍप हॅक करून खासगी माहिती चोरण्यास सुरवात केली आहे. या माहितीच्या आधारावर हॅक करण्यात आलेल्या खातेधारकाकडे खंडणी मागितली जाते. 

सायबर पोलिस ठाण्यात दोन महिन्यांत याविषयी 50हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. व्हॉट्‌सऍप खाते हॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन क्‍लृप्त्या वापरत आहेत. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या नावाने हे आरोपी संपर्क साधतात. बोलण्यात पटाईत असलेले आरोपी स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदतीची गरज नसून ऑनलाइन नोंदी केल्यास आम्हाला देणगीस्वरूपात मोठी रक्कम मिळते, अशी बतावणी करतात. या नोंदणीसाठी तुम्हाला एक कोड पाठवला जाईल, तो फक्त आम्हाला सांगा, असे हे आरोपी सांगतात. त्याचवेळी हे आरोपी व्हॉट्‌सऍपमधील "चेंज मोबाईल नंबर' या ऑप्शनमध्ये संबंधित व्यक्तीचा क्रमांक टाईप करतात. त्यामुळे व्हॉट्‌सऍप तुम्हाला सिक्‍युरिटी व्हेरिफिकेशन (एसव्हीसी) क्रमांक पाठवते; पण हा स्वयंसेवी संस्थेकडून आलेला कोड असल्याचे समजून अनेक जण हा एसव्हीसी क्रमांक फोन केलेल्या व्यक्तीला सांगतात. पुढे याच क्रमांकाच्या साह्याने व्हॉट्‌सऍप खाते हॅक केले जाते. त्यातून तुमची खासगी छायाचित्रे, संभाषणे त्यांच्या हाती लागतात. छायाचित्रांचे मॉर्फिंग करून, पुढे त्याच्या साह्याने खंडणी उकळली जाते. 

फेसबुक व इतर संकेतस्थळांद्वारे कुणाचाही मोबाईल क्रमांक मिळवणे सोपे झाले आहे. याशिवाय अनेक मॉल व सार्वजनिक ठिकाणी बक्षिसाचे प्रलोभन दाखवून विविध फॉर्म भरले जातात. नागरिक नकळत आपला मोबाईल क्रमांक व खासगी माहिती त्यात भरतात. आरोपी त्याचा फायदा उठवतात, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

सध्या व्हॉट्‌सऍप हॅकिंगचे अनेक प्रकार घडत आहेत. सिक्‍युरिटी व्हेरिफिकेशन कोड (एसव्हीसी) क्रमांकाशिवाय व्हॉट्‌सऍप हॅक करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे गुप्त कोड कुणालाही सांगू नयेत. थोडा कठीण पासवर्ड ठेवण्याचीही आवश्‍यकता आहे. 
- अखिलेश सिंग, उपायुक्त, सायबर पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp hacking issue