व्हॉट्‌सअॅपचा लेखी स्टेट्‌स परतला

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

तुम्हाला नवे अपडेट घेऊन सेटिंग्समधील 'अबाऊट अँड फोन नंबर' या ऑप्शनवर क्‍लिक करून पहिल्याप्रमाणेच 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' टाकता येईल.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आपल्यातून हरवलेला व्हॉट्‌सअॅप 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' पुन्हा परतला आहे. व्हॉट्‌सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये हा 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' काढून त्याजागी छायाचित्र किंवा छोटा व्हिडिओ टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु हा बदल युजर्सना काही रुचला नाही. अनेकांनी सोशल मीडियावर याला नापसंती दर्शवत पुन्हा पहिल्यासारखा 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' आणावा असे म्हटले होते. 

युजर्सच्या मतांची दखल घेत व्हॉट्‌सअॅपने आता नव्याने आणलेल्या 2.17.111. या व्हर्जनमध्ये पुन्हा पहिल्यासारखा 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' आणला आहे. सध्या ही सुविधा केवळ अँड्रॉइड धारकांना उपलब्ध असली तरी लवकरच ती आयओएस धारकांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्हॉट्‌सअॅपने स्टेट्‌स म्हणून उपलब्ध केलेले नवे फीचर हे इन्स्टाग्राम अपडेट किंवा फेसबुकवरील स्टेटसप्रमाणे होते. 

'टेक्‍स्ट स्टेट्‌स' परत आणल्यानंतर याची माहिती देताना व्हॉट्‌सअॅपचे प्रवक्ते म्हणाले की, नव्या व्हर्जनमध्ये प्रोफाइल विभागात 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' उपलब्ध करून दिला आहे. आता प्रोफाइल नावानंतर लगेचच हे 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' दिसतील, तुम्ही नवे चॅट सुरू करताना आणि 'ग्रुप इन्फो' पाहताना ते पाहू शकता. यासाठी तुम्हाला नवे अपडेट घेऊन सेटिंग्समधील 'अबाऊट अँड फोन नंबर' या ऑप्शनवर क्‍लिक करून पहिल्याप्रमाणेच 'टेक्‍स्ट स्टेट्‌स' टाकता येईल. तसेच हा स्टेट्‌स 24 तासानंतर नाहीसा होणार नाही, अशी माहितीही या वेळी देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp text status feature retained