प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pluto

प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण...

मुंबई : सूर्यमालेत नेपच्यूनच्या पलीकडे असणाऱ्या प्लुटोला पूर्वी ग्रह मानले जात होते; मात्र त्याच्यासारख्या अनेक खगोलीय वस्तूंचा शोध लागल्याने १६ वर्षांपूर्वी प्लुटोची ग्रह म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली. त्याचा समावेश बटु ग्रहांच्या यादीत करण्यात आला; मात्र अजूनही काही शास्त्रज्ञ प्लुटोला ग्रह मानतात.

सध्याची तरूण पिढी जेव्हा शाळेत होती तेव्हा त्यांना प्लुटो हा ग्रह असल्याचे शिकवले गेले होते. २००६ साली प्लुटोला ग्रहांच्या यादीतून काढून बटु ग्रहाचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून प्लुटो हा वादातीत ग्रह आहे. पण प्लुटोला ग्रह का मानले जात नाही हे जाणून घेऊ या....

कुठे आहे प्लुटो ?

आपल्या सूर्यमालेत मंगळ ग्रहानंतर एक लघुग्रहांचा पट्टा आहे. त्यानंतर गुरू, युरेनस, नेपच्यून ग्रह आहेत. त्यानंतर काही अंतरावरील एका पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बर्फाळ लघुग्रह आहेत. ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. या पट्ट्याला Kuiper Belt म्हणतात. त्यापैकीच एक आहे प्लुटो.

पूर्वी ग्रह म्हणून मान्यता

प्लुटोचा शोधत १९३० लागला. त्यानंतरची ७६ वर्षे म्हणजेच २००६ सालापर्यंत प्लुटोला ग्रह मानले जात होते. विशेष म्हणजेच प्लुटोच्या शोधानंतर ६२ वर्षांपर्यंत कायपर पट्ट्यातील इतर वस्तूंचा शोधच लागला नव्हता. त्यामुळे प्लुटोला निर्विवादपणे सौरमालेतील नववा ग्रह मानले जात होते.

लहान आकार

अद्ययावत दुर्बिणीमुळे सौरमालेतील दूरवरचे चित्रही स्पष्ट होऊ लागले. हळूहळू शास्त्रज्ञांच्या हेही लक्षात आले की प्लुटो हा इतर ग्रहांच्या तुलनेत खूपच छोटा आहे. १९९२ साली कायपर पट्ट्यातील दुसऱ्या वस्तूचा शोध लागला होता. तोपर्यंत हेही स्पष्ट झाले होते की प्लुटो पृथ्वीच्या चंद्रापेक्षाही लहान आहे.

इतर अडचणी

प्लुटोची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेला छेदून जाते. असे इतर कोणत्याही ग्रहाच्या बाबतीत दिसून आलेले नाही. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून कायपर पट्टीतील इतर अनेक वस्तूंचा शोध लागण्यास सुरूवात झाली. त्यांची संख्या शेकडो आहे हेही लक्षात आले. २००५ साली ईरीस नावाच्या एका वस्तूचा शोध लागला जी प्लुटोपेक्षाही मोठी आहे.

विचारमंथन

प्लुटोबाबत शास्त्रज्ञांनी विचारमंथन सुरू केले. प्लुटो आणि ईरीस या दोघांनाही ग्रहाचा दर्जा दिल्यास प्लुटोपेक्षा काही प्रमाणात कमी असलेल्या इतर वस्तूंचे काय, असा प्रश्न उभा राहिला. त्या सर्वांना ग्रहाचा दर्जा दिल्यास किती ग्रहांची नावे लक्षात ठेवता येतील, असाही प्रश्न होता. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी प्लुटोला बुट ग्रहाचा दर्जा देण्याचा निर्णय मतदानाच्या आधारे घेतला.

टॅग्स :science