
घरची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती. नो बॅकअप प्लॅन. मुलीला आयएएस बनवण्यासाठी वडिलांनी सर्वस्व पणाला लावले. रिक्षा, टॅक्सी आणि घर सर्व काही विकले. एकाच वेळी बाप-लेक दोघेही परीक्षा देत होते. कठोर मेहनतीने मुलीने यशाला गवसणी घातली आणि राज्यातील पहिली मुस्लिम महिला आयएएस ठरली. यवतमाळमधील २४ वर्षांच्या या मुलीचा संघर्ष हजारो युवक-युवतींना प्रेरणा देणारा आहे. अदिबा अशफाक असे तिचे नाव... तिच्या खडतर प्रवासाची कहाणी उलगडणारा संवाद...
बारावीनंतर मी आयएएस व्हायचा निर्णय पक्का केला. तोपर्यंत मला डॉक्टर किंवा शिक्षक व्हायचे एवढेच माहिती होते. करिअरचे फारसे पर्याय मला माहीत नव्हते. माझ्या वडिलांच्या मित्राने मला पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेची माहिती दिली. तर माझ्या मामाने मला आयएएस अधिकारी काय असतो, तो समाजावर काय प्रभाव टाकू शकतो, किती जणांचे आयुष्य बदलू शकतो, देशाच्या विकासात त्याचे किती महत्त्वाचे योगदान असते, इत्यादीबद्दल सांगितले. मला माझ्या कुटुबांची परिस्थिती बदलायची होती. दुसऱ्या बाजूला मी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पदवीचा विचार करत होते. तेव्हा माझ्या अनेक मैत्रिणींच्या घरी त्यांच्या लग्नाचा विचार सुरू होता. हे सर्व बघून मी केवळ आपल्या कुटुंबापुरता विचार का करावा, असा प्रश्न पडला. त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती बदलण्याचा विचार पक्का होत गेला. आयएएस अधिकारी हा समाजात बदल घडवू शकतो, हा विचार माझी प्रेरणा ठरला.