
संदर्भ
यंदा भारतात नैर्ऋत्य मॉन्सूनने केरळमध्ये २४ मे २०२५ रोजीच प्रवेश केला. सामान्यतः १ जूनपेक्षा तब्बल आठ दिवस आधी. ही २००९ नंतरची सर्वांत लवकर नोंद असून अंदमान समुद्रात तो १३ मे रोजीच दाखल झाला, जो आतापर्यंतचा विक्रम मानला जातो. काहीच दिवसांत पर्जन्यरेषा कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पूर्वोत्तर राज्यांपर्यंत पोहोचली; विदर्भात तर २८ मे रोजी, म्हणजे नेहमीपेक्षा १८ दिवस आधीच मॉन्सून सक्रिय झाला.
हे गेल्या ५४ वर्षांतील मॉन्सूनचे सर्वांत लवकर आगमन ठरले. मुंबईमध्ये मे महिन्यात २९५ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली. मुंबईत रेल्वेमार्ग तसेच मेट्रो स्थानके जलमय झाली. या हंगामात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.