

The Paper Leak Problem
esakal
लेखक : महेश शिंदे
मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची औषध निरीक्षक पदाची परीक्षा झाली. निकाल लागला, ४८८ उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या; पण काही महिन्यांनी प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर गेल्याचे तपासात समोर आले आणि अखेर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी लागली. त्याच महाराष्ट्रात जून २०२६ मध्ये सहा लाखांहून अधिक उमेदवारांसाठी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) प्रश्नपत्रिका आग्रा येथील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या छापखान्यातून कर्मचाऱ्याने चक्क बुटात लपवून बाहेर नेल्याचे तपासात उघड झाले.
महाराष्ट्रापुरतेच हे चित्र मर्यादित नाही. ऑगस्ट २०२६ मध्ये बिहारमध्ये एका भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. झारखंडमध्येही परीक्षा प्रक्रियेतील गंभीर अनियमितता आणि कथित पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास सुरू आहे.
या घटना वेगवेगळ्या राज्यांतील असल्या, तरी त्यातून निर्माण होणारा प्रश्न एकच आहे, देशातील तरुणांनी परीक्षेच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा?
दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रात केवळ पेन आणि प्रवेशपत्र घेऊन जात नाहीत. त्यांच्यासोबत असतात वर्षानुवर्षांची मेहनत, पालकांनी केलेला खर्च, त्याग आणि गुणवत्तेला न्याय मिळेल ही आशा. प्रश्नपत्रिका फुटते तेव्हा केवळ परीक्षा रद्द होत नाही; शासन आणि तरुणांमधील विश्वासाचा करारही तुटतो.