

Elderly Care and Social Security in India
esakal
भारत सध्या लोकसंख्यात्मक संक्रमणाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशात सुमारे १०.४ कोटी (८.६%) नागरिक ६० वर्षांवरील होते; ही संख्या २०२३ पर्यंत जवळपास ९.७% वर पोहोचली आहे. वाढत्या आयुर्मानामुळे आणि घटत्या प्रजनन दरामुळे भारत हळूहळू 'वृद्धत्वाकडे झुकणारा समाज' बनत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, २०५० पर्यंत भारतातील वृद्धांची संख्या २०.८% (सुमारे ३४.७ कोटी) पर्यंत जाईल. ही वाढ केवळ लोकसंख्यात्मक बदल नसून सामाजिक-आर्थिक व्यवस्थेवर खोल परिणाम करणारी आहे.
आर्थिक दृष्टीने पाहता, सुमारे ४०% वृद्ध नागरिक गरीब घटकात मोडतात, तर १८.७% वृद्धांना कोणतेही स्थिर उत्पन्न नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षितता ही एक गंभीर समस्या बनली आहे. ग्रामीण भागात ही स्थिती अधिक गंभीर असून सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत नाही.