

Iran protest 2025 analysis
esakal
महेश शिंदे
‘इराण आतून पेटत आहे, जनतेला धर्मगुरू (मौलवी) नकोत, त्यांना स्वातंत्र्य हवे आहे.’ इराणमध्ये सुरू असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अलीकडील ट्विट केवळ वैयक्तिक प्रतिक्रिया नाही, तर तो अमेरिकेच्या इराणविषयक पारंपरिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. वॉशिंग्टनमध्ये इराणमधील प्रत्येक आंदोलन हे राजवट बदलीच्या चष्म्यातून पाहिले जाते, तर तेहरानसाठी हे आंदोलन परकीय हस्तक्षेपाने प्रेरित असल्याचा पुरावा ठरते. त्यामुळे इराणमधील सध्याचा असंतोष हा फक्त अंतर्गत प्रश्न राहत नाही; तो तात्काळ आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग बनतो.
मात्र या गोंगाटात एक मूलभूत सत्य दुर्लक्षित राहते ते म्हणजे इराणमधील असंतोष हा अमेरिकेच्या ट्विटमुळे निर्माण झालेला नाही. तो सत्ता, वैधता, ओळख आणि मानवी प्रतिष्ठा यांवरील दीर्घकालीन संघर्षाचा परिणाम आहे जो १९७९ च्या इस्लामी क्रांतीपूर्वीच सुरू झाला होता आणि त्यानंतरच्या दशकांमध्ये अधिकच तीव्र झाला आहे. आज आपण जे पाहत आहोत ते म्हणजे इराणी राज्यव्यवस्था आणि समाजातील न सुटलेल्या विरोधाभासांचे पुन्हा उफाळून येणे, जे आता आर्थिक संकट, पिढीगत बदल आणि प्रादेशिक अस्थिरतेमुळे अधिक तीव्र झाले आहेत.