

Private Space Industry
esakal
लेखक - सुदर्शन कुडचे
भारताच्या अंतराळ क्षेत्रात मोठा संस्थात्मक बदल घडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भविष्यात नियमित प्रक्षेपण वाहनांची निर्मिती करण्याऐवजी संशोधन, नवीन तंत्रज्ञान, वैज्ञानिक मोहिमा आणि महत्त्वाच्या अंतराळ प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची दिशा स्वीकारली आहे. भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन व प्राधिकरण केंद्राचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी २१ ऑगस्ट रोजी झालेल्या एका उद्योग परिषदेत सांगितले की, पुढील काळात प्रक्षेपण वाहनांची निर्मिती खासगी उद्योग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या करतील.
या बदलाचा अर्थ इस्रोचे अंतराळ क्षेत्रातील महत्त्व कमी होणार असा नाही. उलट, इस्रोची भूमिका संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाकडे अधिक केंद्रित होणार आहे. अत्याधुनिक प्रक्षेपण तंत्रज्ञान, वैज्ञानिक मोहिमा, विशेष उपग्रह, मानवी अंतराळ मोहिमा आणि भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी आवश्यक प्रणाली विकसित करण्यावर इस्रोचा भर राहणार आहे. नियमित स्वरूपाची निर्मिती उद्योगांकडे गेल्यामुळे इस्रोला अधिक जटिल आणि संशोधनप्रधान कामांसाठी मनुष्यबळ व संसाधने उपलब्ध होतील.