
शब्दांकन: सावनी गोडबोले
पायल नरेश पाटील (अलिबाग) नावाची एक कर्णबधिर विद्यार्थिनी नुकतीच एमपीएससी (क) परीक्षा उत्तीर्ण झाली. ही परीक्षा ती उत्तीर्ण कशी झाली, कसा अभ्यास केला आणि अजूनही आव्हानांचा सामना ती कसा करते आहे याची ही कहाणी.
आठ वर्षांची असताना बाबा गेले, दहा वर्षांची असताना श्रवणशक्ती गेली तरीही पायल पाटील हरली नाही. तिने जिद्दीने एमपीएससी दिली आणि आता तलाठी म्हणून काम पाहते आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये काही टक्के जागा PWD (Persons with disability) साठी राखीव असतात.
म्हणजे ज्यांना काही प्रकारची कमतरता आहे त्यांच्यासाठी. इतरांना ज्या प्रकारचा संघर्ष करावा लागतो त्यापेक्षा ह्या मंडळींना अधिक आव्हानांचा सामना करायला लागतो. कर्णबधिरता हे तसं छुपं व्यंग..... शारीरिक व्यंगे जशी दिसून येतात तसे हे कळत नाही. .....कारण एखाद्या माणसाला ऐकू येत नाही हे त्याच्याकडे बघून कळत नाही. पण त्या माणसाला इतरांच्या संभाषणात सहजपणे सहभागी होता येत नाही. आणि ऐकू न आल्यामुळे अनेक आव्हाने समोर ठाकतात.