

Academic Pressure in India
esakal
लेखक : सत्यजित हिंगे
आजच्या भारतात विद्यार्थ्यांचे जीवन ‘गुण, परफॉर्मन्स आणि करिअर’ या त्रिसूत्रीभोवती फिरताना दिसते. या स्पर्धात्मक प्रवाहाला आपण ‘रॅट रेस’ असे म्हणतो. ही केवळ आरोग्यदायी स्पर्धा नसून, ती मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दबावांची गुंतागुंत आहे, जी विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक विकासालाच मर्यादा घालते. पालकांच्या अपेक्षा, समाजातील तुलना आणि यशाची अरुंद व्याख्या यांनी शिक्षणाचा खरा अर्थच बदलून टाकला आहे.
भारतातील शिक्षणप्रणाली मोठ्या प्रमाणावर परीक्षाकेंद्री असल्यामुळे विद्यार्थ्यांवर सतत ‘टॉप’ करण्याचा दबाव असतो. बोर्ड परीक्षा, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा या सर्वांमध्ये गुण हेच यशाचे अंतिम मापदंड मानले जातात. परिणामी, सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि कुतूहल यांना दुय्यम स्थान मिळते. कोचिंग क्लासेसची वाढती संस्कृती, रँकिंगची अतिरेकी स्पर्धा आणि सोशल मीडियावरील तुलना या सर्वांनी हा ताण अधिकच वाढवला आहे.