

Management and Leadership Values
esakal
एक कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने तिच्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी खास रजा घेतली होती आणि आता ती पुन्हा कामावर रुजू झाली आहे. आर्थिक कारणांमुळे तिला पूर्ण वेळ काम करण्याची गरज आहे. तिच्या आईच्या घरगुती निगा व्यवस्थेमध्ये अडचणी येत असल्यामुळे तिच्या दिवसाच्या सुरुवातीला होणाऱ्या टीम मिटिंग्स चुकत आहेत आणि तिला कामावरून लवकर निघावे लागत आहे. ती कामात खूप सक्षम आहे; परंतु तिच्या अनुपस्थितीमुळे तिच्यावर आणि आधीच कामाच्या ताणाखाली असलेल्या सहकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. तुम्ही तिचे व्यवस्थापक आहात आणि तुम्हाला जाणवते की, संपूर्ण कार्यसंस्थेतील कामाचा प्रवाह ताणाखाली येत आहे. तिच्या एका पुरुष सहकाऱ्याने ‘बाईचे खरे ठिकाण घरातच असते’ अशा टिप्पणी करायला सुरुवात केली आहे आणि प्रत्येक संधीला तिचे मनोबल खच्चीकरण केले जात आहे, त्यामुळे तिचा ताण आणखी वाढत आहे.
प्रश्न :
तुम्ही असे काय कराल की, ज्यामुळे तुमची, तुमच्या व्यवसायाची किंवा ज्या संस्थेसाठी तुम्ही काम करता त्या संस्थेची बदनामी होणार नाही आणि त्याच वेळी तुमच्या कृतीत प्रामाणिकपणा आणि गोपनीयता (confidentiality) देखील टिकेल?
उत्तर :
या प्रकरणात एक प्रामाणिक आणि सक्षम महिला कर्मचारी आईची जबाबदारी आणि नोकरी या दोन्हींचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाचे ताण यामुळे उपस्थितीवर परिणाम होतो आहे आणि टीमवर अतिरिक्त भार पडतो आहे. त्याच वेळी लिंगभेदात्मक, अपमानास्पद टिप्पणीमुळे तिच्या मानवी सन्मानावर आघात होत आहे. व्यवस्थापक म्हणून व्यावसायिक नैतिकता, समानता, सन्मान आणि गोपनीयता जपत परिस्थिती हाताळणे हे मोठे नैतिक दायित्व आहे. या केसमध्ये सहानुभूती, न्याय, आदर, प्रामाणिकपणा आणि भेदभावमुक्त वातावरण ही मुख्य नैतिक मूल्ये केंद्रस्थानी आहेत.