

Social Inequality in India
esakal
महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाची परंपरा अभिमानाने सांगणाऱ्या भूमीत, नांदेडसारख्या ऐतिहासिक जिल्ह्यात, सन्मानाच्या नावाखाली एका दलित तरुणाचा जीव घेतला जाणे हे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही, तर आपल्या सामूहिक विवेकावर उमटलेला काळा ठसा आहे. जातीच्या चौकटीत अडकलेल्या अहंकाराने, विकृत प्रतिष्ठेच्या कल्पनेने आणि पिढ्यान्पिढ्या पोसलेल्या विषमतेने जेव्हा माणुसकीचा गळा घोटला जातो, तेव्हा त्या मृत्यूची किंमत केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही; ती संपूर्ण समाजाला मोजावी लागते.
या प्रकरणात, प्रेमाचा गुन्हा ठरवून एका तरुणाचे आयुष्य संपवण्यात आले. दलित असणे ही त्याची ओळखच त्याच्या मृत्यूचे कारण ठरली. सामाजिक भिंती ओलांडण्याचे धाडस करणारा हा तरुण, सन्मानाच्या कल्पनांनी अंध झालेल्या मानसिकतेला सहन न झाल्याने लक्ष्य बनला. प्रेम, मैत्री, सहजीवन या मानवी भावनांना जातीच्या तराजूत तोलून ‘अपमान’ ठरवणे आणि त्यातून हिंसक न्याय उगवणे, हे आपल्या लोकशाही मूल्यांवरचा घोर आघात आहे.