

Career Guidance Program
esakal
आकुर्डी : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या शिक्षण, समाजसेवा, नेतृत्व, राष्ट्रनिर्माण आणि शाश्वत विकासाच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी येथे ‘व्हिजन टू ॲक्शन मंथ’ या महिनाभराच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातील पहिला कार्यक्रम ‘करिअर व्हिजन प्रोग्राम’ अंतर्गत ‘सकाळ+ स्टडीरूम – ग्रेट भेट समारोह’ या विशेष मार्गदर्शन सत्राने पार पडला.
सकाळ+ स्टडीरूम आणि ज्ञानदीप अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. डी. वाय. पाटील ॲग्रीबिझनेस करिअर एम्पॉवरमेंट फोरमच्या पुढाकारातून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रशासकीय सेवा आणि करिअरच्या संधींबाबत योग्य दिशा मिळावी, हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
प्रास्ताविकात प्रा. दिग्विजय पवार यांनी दादासाहेबांचा 'गुलाबातील काटे पाहण्यापेक्षा काट्यातील गुलाब बघा' हा प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडला. परिस्थितीकडे सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण या विचारातून मिळते, असे त्यांनी सांगितले.