सम्राज्ञी सेरेना (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 January 2017

तेविसाव्या ग्रॅण्ड स्लॅमवर मोहोर उमटविताना सेरेना विल्यम्सने स्टेफी ग्राफचा विक्रम मागे टाकला नि खेळातले विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, हे सिद्ध केले. या झळाळत्या कामगिरीमुळे पस्तिशीतील सेरेनाने तरुण टेनिसपटूंपुढे आदर्श घालून दिला आहे.

चार ग्रॅण्ड स्लॅम्सपैकी एक असलेले "ऑस्ट्रेलियन ओपन'चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून आफ्रिकन वंशाच्या अमेरिकी सेरेना विल्यम्सने शनिवारी टेनिस इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले. हे तिचे विक्रमी तेविसावे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद. एकोणपन्नास वर्षांपूर्वी, 1968 मध्ये व्यावसायिक खेळाडूंना "विम्बल्डन', "फ्रेंच ओपन', "यूएस ओपन' व "ऑस्ट्रेलियन ओपन' या चार ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांमध्ये प्रवेश सुरू झाल्यापासून- ज्याला "ओपन इरा' म्हणतात- त्यात सर्वाधिक बावीस विजेतेपदे जिंकणारी जर्मनीची महान टेनिसपटू स्टेफी ग्राफचा विक्रम त्यामुळे मोडीत निघाला. थोर बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डनच्या जर्सीचा क्रमांक व जलतरणपटू मायकेल फेल्प्सची ऑलिंपिक पदके यांच्यामुळे अद्वितीय ठरलेल्या तेवीस क्रमांकाच्या बुटाची जोडी घालून सेरेनाने हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. आता "ओपन इरा'पूर्वीच्या काळातल्या मार्गारेट कोर्टची चोवीस अजिंक्‍यपदे हेच सेरेनापुढचे एकमेव आव्हान आहे. खेळातले विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि खुद्द स्टेफीनेच सेरेनाबाबत भाकीत केले होते. तरीदेखील, दोघींपैकी सार्वकालिक महान कोण, ही चर्चा सुरू आहे. व्यक्‍ती, खेळाडू, खेळाची शैली, कारकीर्द अशा सर्व बाजूंनी दोघींची तुलना होत आहे.

स्टेफीचा जन्म 1969चा. सेरेना तिच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान. अव्वल दर्जाची टेनिसपटू म्हणून स्टेफी ग्राफचा उदय झाला, तेव्हा सेरेनाने रॅकेटही हाती घेतले नव्हते. अनुभवी स्टेफी व नव्या दमाची सेरेना यांच्यात दोन लढती झाल्या व दोघींनी एक-एक लढत जिंकली. स्टेफीने अव्वल जागतिक मानांकन मिळवले 1987 मध्ये, तर सेरेना अव्वल ठरली 2002 मध्ये. दोघींनी "विम्बल्डन' प्रत्येकी सात वेळा जिंकले आहे; तर सहा वेळा "यूएस ओपन' जिंकणारी सेरेना एका जेतेपदाने स्टेफीच्या पुढे आहे.

"ऑस्ट्रेलियन ओपन' सात वेळा जिंकणारी सेरेना ही स्टेफीच्या चार जेतेपदाच्या तुलनेत सरस आहे; तर "फ्रेंच ओपन'बाबत मात्र स्टेफी सहा व सेरेना तीन अशी उलटी स्थिती आहे. संपूर्ण कारकिर्दीत मिळून स्टेफी तब्बल 377 आठवडे प्रथम क्रमांकावर होती; तर सर्वाधिक 308 ग्रॅण्ड स्लॅम विजयाचा विक्रम सेरेनाच्या खात्यावर आहे. या तुलनेपलीकडे आहे ती दोघींची भिन्न देहबोली, शैली, खेळातील ताकद अन्‌ झालेच तर खेळातले सौंदर्यही. स्टेफी ग्राफच्या फटक्‍यांमधील नजाकत, खासकरून फोरहॅंडवरची तिची हुकमत अन्‌ त्यासाठी लागणारी चपळाई हे सारे विलोभनीय असायचे. असले नाजूक सौंदर्य भलेही सेरेनामध्ये नसेल. प्रचंड रांगडेपणा व ताकदीचा वापर हे तिचे वैशिष्ट्य. खरेतर तेच तिचे देखणेपणही आहे. म्हणूनच तिचा खेळ पाहतानाही प्रेक्षक एका जागी खिळून असतात.

महिला टेनिसमध्ये बहुतेक कालखंड प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या जोडींसाठी गाजले. मार्टिना नवरातिलोव्हा व ख्रिस एव्हर्ट ही त्यातली ठळक नावे. स्टेफी आली तेव्हा मार्टिनाची कारकीर्द उतरणीला लागली होती. तरीही काही काळ दोघींच्या स्पर्धेने गाजला. नंतर स्टेफी ग्राफ व डावखुरी मोनिका सेलेस यांची जोडी चर्चेत आली. गॅब्रिएला सॅबेतिनी व जेनिफर कॅप्रिअती अशा काहींनी मोनिकाची जागा घेण्याचा प्रयत्न केला; पण स्टेफी-मोनिकाची स्पर्धाच जवळपास दहा वर्षे चर्चेत राहिली. स्टेफीने मैदान सोडले तेव्हा विल्यम्स भगिनींचा उदय झाला होता. मार्टिना हिंगीस किंवा जेनिफर कॅप्रिअतीशी सेरेनाची स्पर्धा झाली खरी; पण खऱ्या अर्थाने दोघी बहिणीच एकमेकींच्या प्रतिस्पर्धी ठरल्या. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांमध्ये 28 वेळा दोघी एकमेकींशी झुंजल्या व त्यापैकी सतरा लढती जिंकून धाकटी सेरेना आघाडीवर राहिली.

पुरुष व महिला टेनिस अलीकडे प्रचंड बदलले आहे. तो आता कौशल्यासोबतच ताकदीचाही खेळ बनला आहे. चेंडूचा वेग व खेळाडूंचे चापल्य टेनिसचे नवे वैशिष्ट्य आहे. अमानवी वाटाव्यात अशा क्षमता खेळाडूंना टिकवून ठेवाव्या लागतात. म्हणूनच अठरा-वीस वर्षांच्या तरुणांचा सामना मायकेल फेडरर, राफेल नदाल किंवा विल्यम्स भगिनींसारखे तिशी-पस्तिशी ओलांडलेले खेळाडू करू शकतात. नव्या दमाची शारीरिक क्षमता आणि अनुभव व मानसिक खंबीरपणा यांच्यातला हा संघर्ष टेनिसरसिकांसाठी पर्वणी आहे. "ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये तर यंदा इतिहास घडला. शनिवारच्या अंतिम सामन्यात पस्तिशी पार केलेल्या विल्यम्स भगिनी एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या; तर पस्तिशी ओलांडलेला रॉजर फेडरर व तिशी पार केलेला राफेल नदाल यांच्यात पुरुषांचा अंतिम सामना झाला आणि ही "ड्रीम फायनल' जिंकून अठरावे ग्रॅण्ड स्लॅम पटकावताना फेडररने नव्या विक्रमाचीही नोंद केली. सेरेनाप्रमाणेच वाढत्या वयाचा आपल्या खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही, याचाच प्रत्यय फेडररने पाच वर्षांनंतर विजेतेपदाला गवसणी घालताना दिला, ही बाबही उल्लेखनीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serena williams queen of tennis