INDvsSA : फलंदाज, गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी; भारत 1 बाद 75

ज्ञानेश भुरे
Thursday, 10 October 2019

पुणेकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या पावसाने किमान गहुंजे येथे विश्रांती घेतली आणि काहिशा धुक्याने दाटलेल्या हवामानात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट कसोटी सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी पाहिली गेली.

पुणे : पुणेकरांच्या मनात धडकी भरविणाऱ्या पावसाने किमान गहुंजे येथे विश्रांती घेतली आणि काहिशा धुक्याने दाटलेल्या हवामानात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट कसोटी सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्षमतेची कसोटी पाहिली गेली. कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्राच्या खेळात भारताने सावध सुरवात करताना रोहित शर्माच्या बदल्यात पाऊणशे धावांची मजल मारली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा मयांक अगरवाल 34 आणि चेतेश्वर पुजारा 16 धावांवर खेळत होता.

मनिष पांडे करणार 'या' दाक्षिणात्य स्टारशी लग्न

पावसाने गुरुवारी पुण्याला झोडपले. मात्र, सामन्याच्या ठिकाणी तो फिरकलाच नाही. रात्री उशिरा येथे पाऊस पडला. पण, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पाण्याचा निचरा होण्याची असलेली सर्वोत्तम सुविधा यामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला. अलिकडच्या काळात महत्व आलेला नाणेफेकीचा कौल भारताचा कर्णधार विराट कोहलीने मिळविला आणि अपेक्षितपणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या कसोटी सामन्यात खेळलेल्या संघात कोहलीने एक बदल करताना खेळपट्टीचे स्वरुप आणि हवामानाचा अंदाज घेत एक जास्तीचा गोलंदाज खेळविणे पसंत केले. यासाठी त्याने हनुमा विहारीला वगळून वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी दिली. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका संघाने डेन पीएडट याला वगळताना अ‍ॅन्रिच नॉर्टजे याला पदार्पणाची संधी दिली.

मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा या लयीबरोबरच भरात असणाºया जोडीने भारताच्या डावाची सुरवात केली. खेळपट्टीवर असणारे गवत आणि सकाळच्या वेळेत गोलंदाजांना मिळणारा स्विंग याचा अभ्यास करत मयांक, रोहित जोडीने सावध सुरवात केली. सुरवात सावध राहिली असली, तरी त्यात कमालीचा संथपणा देखील होता. त्यात व्हर्नान फिलँडर, कागिसो रबाडा यांच्या गोलंदाजीतही कमालीची अचूकता होती. त्यामुळे मयांक आणि रोहितला स्वातंत्र्य घेणेही जमले नाही.

शाब्बास शमी; फाफचे मानपत्र, विराटचे प्रमाणपत्र

रबाडा आणि फिलँडर यांनी चेंडू चांगल्या प्रकारे बाहेर काढले. यात एक दोनदा भारतीय फलंदाज सुदैवी ठरले. मात्र, अखेरीस रबाडाच्या संयमाच्या कसोटीला फळ आले. खेळपट्टीकडून मिळणाºया बाऊन्सचा या वेळी त्याला फायदा झाला. रोहितने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, खरा पण चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतलीच आणि यष्टिरक्षक डी कॉकने चूक केली नाही. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात श्तक झळकाविणाºया रोहिल्तला बाद केल्यावर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भरून पावले.

मात्र, त्यानंतर मयांक आणि चेतेश्वर यांनी त्यांच्या संयमाची कसोटी पाहिली. चेतेश्वरने नेहमीप्रमाणे खाते उघडण्यास वेळ घेतला. तरी, समोरून मयांक आत्मविश्वासाने खेळत होता. या दोघांनी देखील घाईला दूरच ठेवले आणि चेंडूचा सुरेख सामना करताना उपाहारापर्यंत संघाचे नुकसान होऊ दिले नाही. अर्धशतकी भागीदारी करताना या जोडीने भारताच्या डावाला स्थिरता दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India scored 75 runs before lunch in 2nd test against South africa