
गतविजेता नोव्हाक जोकोविच, रॅफेल नदाल, रॉजर फेडरर या तीन महान टेनिसपटूंची कामगिरी हेच यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे आकर्षण राहणार आहे. त्याचवेळी सेरेना विल्यम्स महिला एकेरीतून पुन्हा विजेतेपदाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करेल.
न्यूयॉर्क - गतविजेता नोव्हाक जोकोविच, रॅफेल नदाल, रॉजर फेडरर या तीन महान टेनिसपटूंची कामगिरी हेच यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे आकर्षण राहणार आहे. त्याचवेळी सेरेना विल्यम्स महिला एकेरीतून पुन्हा विजेतेपदाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करेल.
टेनिसमध्ये अनेक युवा खेळाडूंचा सहभाग वाढला आहे. अमेरिकन स्पर्धाही याला अपवाद नाही. त्यांच्याकडे गुणवत्ता असून, सुरवातीच्या फेऱ्यांमध्येच दिगज्जांच्या पराभवाचे स्वप्न ते उराशी बाळगून असतील. पण, त्यांच्यासाठी हे आव्हान सोपे नसेल. जोकोविच, नदाल आणि फेडरर यांच्यातच गेल्या अकरा स्पर्धांचे विजेतेपद विभागले गेले आहे.
जोकोविचने 17, तर फेडररने सर्वाधिक 20 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. युवा टेनिसपटू देखील आपला ठसा उमटवत आहेत. या संदर्भात फेडरर म्हणाला,""मी नदाल आणि जोकोविच तंदुरुस्त आहोत. अँडी मरेपण हळू हळू परतत आहे. अशा वेळी युवा खेळाडूंचा प्रवास नक्कीच सोपा नसेल. माझ्यासाठी देखील विजेतेपदापर्यंत पोचणे सोपे नाही. याची कल्पना आहे. पण, मी आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे.''
जोकोविच गेल्या पाच पैकी चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचा विजेता आहे. तो म्हणाला.""गेल्या काही कालावधीत आपण विजेतेपदाच्या अतिरिक्त दबावाचा सामना करण्यास शिकलो आहोत. ग्रॅंड स्लॅम विजेतेपद राखणे कमालीचे आव्हानात्मक असते. अशा आव्हानाचा सामना आता अंगवळणी पडला आहे.''
महिला विभागात अर्थातच सेरेनाकडे लक्ष असेल. गेल्या वर्षी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचांशी झालेला तिचा वाद चांगलाच गाजला होता. कारकिर्दीमधील 24वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवून ती मार्गरेट कोर्ट यांच्या सर्वकालिन विक्रमाशी बरोबरी करू शकेल. सेरनाने 2017 नंतर एकही ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविलेले नाही. यंदा तिचा मार्ग सोपा असला, तरी उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर ऍशले बार्टी हिचे आव्हान असू शकते. पहिल्या फेरीत तिची गाठ रशियाच्या मारिया शारापोवाशी पडणार आहे. गत विजेती नाओमी ओसाका, सिमोना हालेप, कॅरोलिन प्लिस्कोवा यांच्यादेखील कामगिरीकडे लक्ष असेल.
कार्लोस रामोस पंच नसणार
गेल्यावर्षी अंतिम लढतीत गुणावरून सेरेना विल्यम्स आणि पंच कार्लोस रामोर यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. त्या वेळेस सेरेनाने पंच रामोस यांना खोटारडे आणि चोर म्हटले होते. हेच पंच रामोस या वेळी अमेरिकन स्पर्धेत असतील, पण ते सेरेना किंवा व्हिनस विल्यम्सच्या कुठल्याही सामन्याला पंच राहणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.
सुमितचे पदार्पण
भारताचा सुमित नागल या वर्षी अमेरिकन ओपन टेनिसमध्ये पदार्पण करणार आहे. पात्रता फेरीतून त्याने मुख्य फेरीत स्थान मिळविले. या पूर्वी सोमदेव देवबर्मन, युकी भांबरी, साकेत मायनेनी, प्रज्ञेश गुणेश्वरन या स्पर्धेत खेळले आहेत. यंदा प्रज्ञेशही खेळणार आहेत. 1998 नंतर प्रथमच भारताचे गोन पुरुष खेळाडू एखाद्या ग्रॅंड स्लॅमच्या मुख्य फेरीत खेळणार आहेत. सुमितचे पदार्पण सोपे नसेल, पहिल्याच फेरीत त्याची गाठ रॉजर फेडररशी पडणार आहे.