‘ऑक्‍सिजन पार्क’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

राज्यातील हे सर्वांत जुने अभयारण्य आहे. राधानगरीचा लक्ष्मी तलाव आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालचा परिसर मिळून १९८५ला पुन्हा विस्तार झाला आणि याची ओळख राधानगरी अभयारण्य अशी झाली.

कोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून संबोधले जाते, असे राधानगरी अभयारण्य पश्‍चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील परिसरात येते. दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगलपट्टा आहे. निमसदाहरित जंगलप्रकारात याचा समावेश होतो. हेच जंगल ‘राधानगरी अभयारण्य’ म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर संस्थानचे विलिनीकरण झाल्यानंतर सन १९५८ मध्ये दाजीपूर जंगलाची अभयारण्य अशी ओळख झाली. राज्यातील हे सर्वांत जुने अभयारण्य आहे. राधानगरीचा लक्ष्मी तलाव आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालचा परिसर मिळून १९८५ला पुन्हा विस्तार झाला आणि याची ओळख राधानगरी अभयारण्य अशी झाली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौरस किलोमीटर आहे. या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस होतो. दाजीपूर आणि राधानगरी हे या अभयारण्याचे अविभाज्य भाग आहेत. येथील घनदाट जंगलांचे पट्टे ‘डंग’ म्हणून ओळखले जातात. डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत. त्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलात जैवविविधता आढळते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या अभयारण्यात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किड्‌स, फुले, नेचे, बुरशी आढळतात. साग, शिसव, सावर, फणस, आंबा, जांभूळ, पळस, पांगिरा, अंजन, खैर, कारवी आदी काही नावे सांगता येतील. या अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारतीय द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथे आहेत. ३०० पेक्षा अधिक औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूडशेंग, वाघाटी, सर्पगंधा, धायटी आदी झुडपे व वेली आहेत.

देवगांडूळ हा पर्यावरणासाठी महत्त्वाचा; परंतु दुर्लक्षित प्राणी आहे. येथे एका नव्या पालीचाही शोध लागला आहे. ३३ प्रजातीचे साप नोंदलेले आहेत. यात ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्‍स व्हीटेकरी, पाईड बेली व शिल्डटेल अशा दुर्मिळ सापांचाही आढळ आहे. फुलपाखरांच्या १२१ प्रजातींची येथे नोंद आहे. सदर्न बर्डविंग हे देशातील सर्वांत मोठे (९० मिलिमीटर) फुलपाखरू येथे असून, ग्रास ज्युवेल हे सर्वांत लहान फुलपाखरू (१५मिलिमीटर) येथे आढळते. सामूहिक स्थलांतर करणारीही फुलपाखरे आहेत. गव्यांसाठी विशेष प्रसिद्ध असे हे अभयारण्य असून त्याशिवाय येथे ३५ प्रकारचे वन्य प्राणी आढळतात. यांमध्ये वाघ, बिबटे, काळा बिबट्या, लहान हरिण (पिसोरी), रानकुत्रा, अस्वल, सांबर, भेकर, चौशिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर, खवले मांजर, शेकरू, लंगूर, ससा आदींसह वटवाघळांच्या तीन जातींचा समावेश आहे. शिवाय २३५ विविध प्रकारचे पक्षी येथे आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परिसरातील लक्ष्मी सागर जलाशय, शाहू सागर जलाशय, सावराई सडा, सांबरकोंड, कोकणदर्शन पॉइंट, वाघाचे पाणी, सापळा, उगवाई देवराई, शिवगड किल्ला ही पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत.

कसे जाल? 
कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटरवर राधानगरी हे तालुक्‍याचे ठिकाण आहे. राधानगरीतून थेट पुढे तीस किलोमीटरवर अभयारण्याचे मुख्य गेट दाजीपूर येथे आहे.
अभयारण्यात जीपच चालते. त्या येथे भाड्यानेही मिळतात.
राहण्याची सोय
राहण्यासाठी राधानगरीत अनेक हॉटेल्स आहेत. दाजीपूर येथे वन्यजीव विभागाच्या तंबू निवासाची सोय आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Radhanagari Sanctuary