सेलिब्रिटी वीकएण्ड : मनसोक्त भटकंती...!

Ashwini-Darekar
Ashwini-Darekar

मी स्वतः अभिनय करत नसले, तरी अभिनयाशी माझा जवळचा संबंध आहे. कारण, निर्माती असल्याने अनेक कामे मला करावीच लागतात. त्यातच आर्थिक बाजू माझ्याकडे येते. आपण करत असलेली कलाकृती उत्तम आणि दर्जेदार असावी, असे मला नेहमीच वाटते. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीमध्ये तडजोड केलेली आवडत नाही.

मला सामाजिक कार्याची आवड असल्याने मी एका सामाजिक विषयावर काम करत आहे. हे करतानाच आठवडा कसा निघून जातो, ते कळत नाही. त्यामुळे माझ्यासह कुटुंबीयांनाही वेळ द्यावा लागतो. त्यासाठी माझा वीकएंड शुक्रवारी सुरू होतो आणि रविवारी संपतो. दर शुक्रवारी मी ठाण्याला जाते, जेथे माझी आई राहते, तेथे आमची शेतीही आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला मला खूप आवडते. ठाणे जिल्ह्यात फक्त भात शेतीच होते. पण, दोन वर्षांपूर्वी आम्ही उसाचे पीक यशस्वीरीत्या घेतले. आताही ऊस लागवड केली आहे. त्याचबरोबर २५० म्हशींचा प्रोजेक्‍टही आहे. आम्ही दोन घोडेही घेतले आहेत.

त्याचबरोबर आमच्या अकोले तालुक्‍यातील सीडमदर राहीबाई पोपेरे यांच्याकडून देशी बियाणे आणले असून, भाजीपाल्याची लागवडही केली आहे. आमच्या शेतामध्ये ट्रॅक्‍टरबरोबरच बैलगाडीही आहे. त्याचप्रमाणे देशी गायीही आहेत. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आमच्या शेतातील वातावरण नैसर्गिक असून, तेथे राहिल्याने सर्वांचे मन प्रसन्न होते. आम्ही तीन दिवस शेतात काही ना काही करत असतो. त्याचबरोबर मला वाचनाचीही आवड आहे. त्यामुळे मी पुस्तकेही घेऊन जाते. वेळ मिळाल्यास शेतामध्येच निवांतपणे वाचनही करते. या सर्व गोष्टींचा प्रभाव कुटुंबावरही पडतो. मुलीलाही आनंद होतो. त्याचबरोबर अकोले तालुक्‍यातील भंडारदरा व कळसूबाई शिखरांच्या परिसरातही फिरते. त्यातून सकारात्मक ऊर्जाही मिळते. 

चित्रपटांच्या निमित्ताने सारखा प्रवास होतो. अनेकदा मी जंगल सफारीही करते. जेथे कोणीही येत नाही, मोबाईलला रेंज नसते, फक्त आणि फक्त आपले कुटुंबीय असतात अशा ठिकाणीही जायला मला आवडते. शॉपिंगला गेले तरी ती अगदी थोड्या वेळात करते. चित्रपट आणि नाटक पाहण्याचीही मला आवड आहे. खरेतर या भटकंतीचा मला ‘झिपऱ्या’ या चित्रपटासाठी फायदा झाला. कारण, त्याच बहुतांश चित्रीकरण रेल्वे स्टेशनवरच करण्यात आले. भटकंतीमुळे ओळखीही झाल्या होत्या. ठाण्यामधील आमच्या मित्र-मैत्रिणींच्या कट्ट्यावरील गप्पांमधून चित्रपटासाठी अनेक चांगले लोकेशन मिळत गेले. त्यामुळे मी वीकएंड खूपच चांगल्यापद्धतीने एन्जॉय करते. त्यातून ऊर्जा मिळते आणि पुढील आठवडा अतिशय आनंदात जातो. तेव्हा सर्वांनीच आपल्यावरील ताणतणाव कमी करण्यासाठी वीकएंडला आपल्यासह कुटुंबीयांसाठी वेळ द्यावा. 
शब्दांकन - अरुण सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com