बुकीश : जंगल लोअर

माधव गोखले
Saturday, 8 February 2020

वाइल्डलाइफ हा शब्दही ऐकला नव्हता, तेव्हापासून मी जिम कॉर्बेट आणि त्यांच्या शिकार कथांशी परिचित आहे. रूद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या वाचल्यानंतर कितीतरी दिवस वाड्यातल्या अंधारभरल्या जिन्यांवरून जायची यायची भीती वाटायची.

वाइल्डलाइफ हा शब्दही ऐकला नव्हता, तेव्हापासून मी जिम कॉर्बेट आणि त्यांच्या शिकार कथांशी परिचित आहे. रूद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या वाचल्यानंतर कितीतरी दिवस वाड्यातल्या अंधारभरल्या जिन्यांवरून जायची यायची भीती वाटायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिन्यात कुठंतरी बिबट्या दबा धरून बसला असेल तर काय घ्या...? विसाव्या शतकाच्या पहिल्या एक-दोन दशकांत देवभूमी हिमालयाच्या पायथ्याच्या गढवाल, कुमाऊँ भागात दहशत पसरवणाऱ्या वाघांचा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करणारा धाडसी शिकारी ते जागतिक प्रसिद्धी मिळवणारा वन्यजीव संरक्षक हा कॉर्बेट यांचा प्रवास. कॉर्बेट यांच्या शिकारकथांशी परिचय असला, पण त्यांच्या जोडीनं कॉर्बेट यांनी लिहिलेल्या अन्य काही पुस्तकांकडं अरण्यकथाप्रेमींचं लक्ष क्वचितच जातं. अरण्याचं सांगोपांग दर्शन घडवताना अरण्यवाचनाचा संस्कार करणारं कॉर्बेट यांचं या यादीतलं एक पुस्तक म्हणजे जंगल लोअर.

शिकारकथांमधून कॉर्बेट यांचे बोट धरून वाघा-बिबट्यांच्या मागावर जाताना जसा जीव मुठीत धरावा लागतो, तसा अनुभव एक दोन जागा वगळल्या तर ‘जंगल लोअर’ वाचताना येत नाही. हे पुस्तक म्हणजे कॉर्बेट यांचे आत्मचरित्र नसले, तरी जंगल लोअर किंवा त्याच्याच जातकुळीतलं ‘माय इंडिया’ वाचताना कॉर्बेट नावाचा शिकारीच नव्हे, तर कॉर्बेट नावाचा एक माणूसही भेटत राहतो.

अरण्यातल्या सौंदर्याबरोबरच कॉर्बेट यांच्या खास शैलीत अरण्यातले अनुभव वाचताना कॉर्बेट आपल्याला अरण्यात फिरवत नेतात. माझी जंगल लोअरशी ओळख झाली ती वनांशी जवळीक असलेल्या मित्राकडून ऐकलेल्या बान्शी किंवा हडळीच्या गोष्टीमुळं. हिमालयाच्या परसातल्या गावांच्या मनात धडकी भरवणाऱ्या चुडेलची ही किंकाळी आपण एकूण तीन वेळा ऐकल्याचं कॉर्बेट सांगतात.

रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबट्याच्या मागावर असताना एका रात्री त्याच बिबट्यानं आपला डाकबंगल्यापर्यंत पाठलाग केल्याचं कॉर्बेट नोंदवतात. असाच एक प्रसंग जंगल लोअरमध्येही येतो. त्यातून कॉर्बेट वाचकाला जंगल सेन्सिटिव्हिटीबद्दलही सांगून जातात.     

ब्रिटिश कादंबरीकार, कवी मार्टिन बूथ हे कॉर्बेट यांचे चरित्रकार. अलीकडच्या आवृत्तीमध्ये जंगल लोअरची ओळख करून देताना बूथ लिहितात, अत्यंत साधेपणी हे पुस्तक कॉर्बेट आणि निसर्गाचं एकमेकांशी असलेलं नातं उलगडत नेतं. लहानग्या वयात गोफण आणि तीर-कामठा घेऊन रानावनात फिरणाऱ्या कॉर्बेटना त्या विशाल अरण्यशाळेत मिळालेले धडे ‘जंगल लोअर’मध्ये वाचता येतातच पण त्याही पलीकडं जात ‘जंगल लोअर’ अरण्याबाबतची संवेदनशीलता अधोरेखित करत राहते. हे पुस्तक प्रसिद्ध होऊन आता सहासष्ट वर्षे उलटून गेली आहेत. हे पुस्तक लिहीत असताना जिम यांना आजूबाजूची माणसं  प्राणी आणि वनस्पतींच्या जगाकडं दुर्लक्ष करत असल्याची जाणीव अस्वस्थ करत होती. आधुनिक माणसांच्या पर्यावरणाबद्दलच्या अनास्थेबद्दल लिहिताना ते निसर्गाची बाजू समर्थपणे मांडतात आणि म्हणूनच ‘जंगल लोअर’ कालबाह्य वाटत नाही, असं बूथ आवर्जून सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article madhav gokhale on forest