भटकंती : पाच नद्यांचा संगम : अंभोरा

मयूर जितकर
Friday, 8 May 2020

कसे जाल?
अंभोरा नागपूरवरून साधारणपणे ८० किलोमीटर अंतरावर आहे. नागपूरवरून पाच गाव, डोंगरगाव, कुटी, वेलतूर मार्गे जाता येते. भंडाऱ्या‍वरून ते १८ कि.मी. अंतरावर आहे.

जवळचे रेल्वे स्थानक
उमरेड रेल्वे स्थानक
भंडारा रोड रेल्वे स्टेशन,
नागपूर जंक्शन.

एखाद्या निसर्गचित्रात रमणीय नदी, दाट वनराई आणि टेकडीवरील महादेवाचे मंदिर असते. अगदी तसाच निसर्ग आपल्याला विदर्भातील अंभोऱ्याला पाहायला मिळतो. येथे पाच नद्यांच्या संगमाचे विहंगम दृश्‍य पाहायला मिळते. ते विदर्भातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भंडाऱ्यावरून येथील महादेव मंदिरापर्यंत होडीतून जलपर्यटनाचाही आनंद घेता येतो. स्थानिक बोली भाषेत या होड्यांना डोंगा असे म्हणतात. या डोंग्यातून नदी पार करून मंदिरापर्यंत जाण्याचा अनुभव अविस्मरणीयच. अंभोऱ्यामधील टेकड्यांना ब्रम्हगिरी पर्वत म्हणतात. अंभोऱ्याला तब्बल पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, आंब, कन्हान, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर हे देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणाला नैसर्गिक व सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्व आहे.

दाट झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू या निसर्गसौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर पाहताच सर्व दु:खांचा विसर पडतो. मन प्रसन्न होते. हे मंदिर महादेवाच्या प्राचीन मंदिरासारखेच आहे. पांढऱ्या चुन्याने रंगविलेले मंदिर दुरवरूनच आपले लक्ष वेधते. सर्व दु:खांचा नाश करणारा चैतन्यश्वर अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील कणाकणात चैतन्य जाणवते. त्यामुळेच की काय, या महादेवाचे नावही चैतन्यश्वर आहे. त्याचप्रमाणे अनेक दुर्मीळ वनस्पतीही या ठिकाणी आहेत. मराठीतील आद्यकवी श्री मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ इथे लिहिल्याचे मानले जाते. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्राही भरते.

यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगढमधूनही भक्त येतात. या शिवाय कार्तिक स्नान समाप्ती आणि दशाहार, गंगापूजन, असे काही उत्सव इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मंदिराच्या पश्चिमेला तीन समाधी मंदिर आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एक समाधी नेपाळच्या राजाच्या मुलाची आहे. त्याचप्रमाणे श्री. हरिनाम महाराज व त्यांचे शिष्य श्री रघुनाथ ऊर्फ रामचंद्र महाराज यांच्या संजीवन समाधीचा समावेश आहे. समाधी मंदिराच्या शेजारी एक सुंदर बगीचा असून, त्यात अनेक दुर्मीळ वनस्पती आणि झाडे लावण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mayur jitkar on tourism ambhora