भटकंती : बिरवाडीचे आरसीपानी सौंदर्य

पंकज झरेकर
Friday, 17 July 2020

पावसाळ्यात शहरातली रिपरिप आणि चिखलाने भरलेले रस्ते, त्याचे काळे मळकट पाणी, राडा यातून सुटका करण्यासाठी आडवाटांची भटकंती हवीच. मात्र सध्या लॉकडाउनमुळे ही भटकंती अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हे लेख आणि कात्रणे सांभाळून ठेवा आणि लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यावरच भटकंती करा.

पावसाळ्यात शहरातली रिपरिप आणि चिखलाने भरलेले रस्ते, त्याचे काळे मळकट पाणी, राडा यातून सुटका करण्यासाठी आडवाटांची भटकंती हवीच. मात्र सध्या लॉकडाउनमुळे ही भटकंती अवघड होऊन बसली आहे. त्यामुळे हे लेख आणि कात्रणे सांभाळून ठेवा आणि लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यावरच भटकंती करा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या रांगा रेखलेल्या आहेत. या रांगांच्या कुशीत अनेक लहान गावे वसली आहेत आणि त्यांना जोडणारे आडवे तिडवे रस्ते. कित्येकदा आपणांस या गावांची आणि रस्त्यांची माहिती नसते, पण पाऊस सुरू झाल्यावर ही गावे निसर्गसौंदर्याने नटू लागतात. डोंगर हिरवे होतात, भातलावणीची लगबग सुरू होते, झरे ओढे खळाळू लागतात. असाच एक सुंदर घाट म्हणजे भोर ते महाड रस्त्यावरचा वरंधा घाट. बहुतेकांना माहीत आहेच, पण नीरा देवघर धरणाचे पाणी, वरंधा घाट, त्याची विशाल दरी, धबधबा, घाटात चहा-भजी या सोपस्कारानंतर घाट उतरल्यावर कोकणात एक नवीन परिसर सामोरा येतो, तो म्हणजे बिरवाडीचा आरसपानी परिसर. बिरवाडी औद्योगिक वसाहतीनंतर एक आडवाटेवरचा रस्ता निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो.

वारंगी-आमशेत-दापोली गावाच्या रस्त्यावर एक अद्भुत निसर्गशिल्प समोर येते ते पूर्वेला असलेला पुराणपुरुष अभेद्य सह्याद्री, त्याच्या पोटातून खाली कोकणात बोरट्याची नाळ, बोचेनाळ, फडताड नाळ, शेवत्या घाट, मढेघाट अशा तोरणा-राजगड परिसरातून उतरणाऱ्या घाटवाटा, त्याच्या अंगावरुन स्वच्छंदपणे स्वतःला झोकून देणारे धबधबे. त्याच धबधब्याच्या प्रवाहांची एकत्र होऊन तयार होते ती पश्चिमवाहिनी काळ नदी. बरेच अंतर हा रस्ता त्या नदीच्या काठाकाठानेच जात राहतो आणि एके ठिकाणी पाषाणाच्या पठाराचे छाताड फोडून काळ नदी एक भली मोठी घळ तयार करते आणि काळ नदी स्वतः तिथे रौद्र रुप धारण करते. या ठिकाणचे नाव वाळणकोंड. जीवदायिनी देवीचे इथे ठाणे आहे. त्यावरुन या घळीला आईचा कोंड/कुंड असेही नाव पडले आहे. मंदिराशी जाण्यास काळ नदीवर एक रज्जूपूल (सस्पेंशन ब्रिज) उभारला आहे. चप्पल पुलाच्या अलीकडे ठेवून या पुलावरुन चालत मंदिराशी जाता येते. पुलावरून खालच्या घळीत रौद्ररूपात वाहणाऱ्या काळ नदीचे दर्शन छातीत धडकी भरवते. नदीपात्रात अनेक ठिकाणी वेगवान प्रवाह आणि सोबत असलेले दगडगोटे यांमुळे रांजणखळगे तयार झालेले आहेत. या दृश्याच्या पार्श्वभूमीवर असतात मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार कातळकडे आणि त्यांची ढगांत लपलेली शिखरे, त्याच्या अंगाखांद्यावरुन उसळणारे धबधबे. अधून मधून येणारी पावसाची सुखद सर.

एक दिवसांची ही भटकंती मन रिफ्रेश करून टाकते. या सोबतच महाडच्या आसपास असलेली कुडा-मांदाडची लेणी, शिवथरघळ, लिंगाणा अशी भटकंतीही साधता येईल. महाड परिसरात रायगड प्रभावळीतले अनेक लहान लहान किल्ले आहेत. त्यांची भटकंती करता येईल. कुठे चिखलातली भातलावणी अनुभवता येईल, ओढ्याच्या खळाळत्या सुरक्षित पाण्यात खेळता येईल.

कसे जाल
पुणे-भोर-वरंधा घाट-बिरवाडी-वाळणकोंड किंवा मुंबई-महाड-बिरवाडी-वाळणकोंड.

काय काळजी घ्याल?
वाहत्या पाण्यात उतरु नये, खडकावर असलेल्या शेवळापासून जपून चालावे. सह्याद्री जैवविविधता क्षेत्र असल्याने तिथे कचरा करू नये, रानातील प्राणी, वनस्पती यांना त्रास होईल असे वर्तन करू नये.

खाण्याची सोय
वरंधा घाटात, शिवथरघळ, बिरवाडी इथं जुजबी खाण्याची सोय होऊ शकते. महाडमध्ये अनेक हॉटेल्स आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article pankaj jharekar on birwadi nature