भटकंती : निसर्गरम्य वालदेवी धरण

पंकज झरेकर
Saturday, 14 March 2020

उन्हाळा सुरू होतोय. पूर्ण दिवसभराची भटकंती हळूहळू कमी होत जाईल. नाशिक शहराला लागून असलेली जागा आज बघूयात. ती आहे वालदेवी धरण आणि परिसर. नाशिक शहरापासून अगदी जवळ, म्हणजे फक्त २० किलोमीटरवर हे वालदेवी धरण आहे. मुंबईच्या दिशेने महामार्गाने निघालात आणि विल्होळी गाव मागे सोडले, की उजव्या हाताला एक फाटा आत जातो. त्या लहानशा रस्त्याने आतमध्ये साधारण चार किलोमीटरवर डाव्या हाताला या धरणाचे अस्तित्व जाणवेल.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अगदी धरणाच्या भिंतीपासून दोनेकशे मीटरवर गाडी लावता येते. गाडी लावून फेरफटका मारायला बाहेर पडलात की स्वच्छ आणि शीतल वाऱ्याने उन्हाळ्याचा शिणवटा कुठल्याकुठे पळून जाईल. धरणाच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्रीची रांग आणि त्याचे सुळके दिसतात. त्यात घारगड किल्ला (गडगडा), अंबोली डोंगर, त्याच्या पाठीमागे अंजनेरी किल्ला आणि डांग्या सुळका अशी रांग आहे. 

गाडी लावून आकसलेल्या जलाशयाच्या सपाटीवरून हवा खात पायी रपेट करायची. क्षितिजापल्याड डोंगराच्या आड अस्ताला जाणाऱ्या नारायणाला निरोप देत असताना आकाशातल्या बगळ्यांच्या माळा, काठावरल्या दगडांवर ध्यानस्थ बसलेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या खाणाखुणा पाहायच्या. मुलांना मातीत खेळायला सोडायचे. कुटुंबीयांसोबत सुखाच्या चार गोष्टी करायच्या. वालदेवी धरणाच्या काठाशी नुसते निवांत बसलात तरी हे सगळे साध्य होते. सायंकाळी धरणाच्या अल्याडपल्याड थोडीफार घरे आणि शेती आहे, तिथली हालचाल दुरून पाहून ग्रामीण जीवनाचा हेवा वाटू लागतो. अशा वेळी कधीतरी ट्रायपॉडवर कॅमेरा सेट करून एखादाच फोटो काढायचा. अंधार पडता समाधानी मनाने घरची वाट धरायची.

उन्हाळ्यात फॅमिलीला खूश ठेवूनही भटकंती करायची, तर या अशा आपल्या आसपासच्या जागा शोधा. वीकएण्डच्या वामकुक्षीनंतर गुगल मॅप झूमइन-झूमआउट करून गर्दीच्या रस्त्यांपासून दूर असाच एखादा निवांत तलाव हेरायचा. उन्हाळ्याच्या किचाटात निवांत आणि शीतल वारा खाऊ घालणारी संध्याकाळ घालवण्यासाठी!
जाण्यासाठीचा मार्ग : नाशिक-विल्होळी-पिंपळद-वालदेवी

सूचना - सह्याद्रीत कचरा करू नका. पक्ष्यांना आणि स्थानिक जैवविविधतेला हानी होईल असे वर्तन करू नका.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article pankaj jharekar on Natures Waldevi Dam