भटकंती : टाहाकारीचे शिल्पसौंदर्य जगदंबा मंदिर

Jagdamba-Temple
Jagdamba-Temple

आपण मागील भागात अकोल्याचे सिद्धेश्‍वर मंदिर पाहिले. त्याच परिसरातील आणखी एक शिल्पसौंदर्याने नटलेले ठिकाण म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदिर. अकोले-देवठाण मार्गे  टाहाकारीला जाणारा रस्ता आपल्याला थेट आढळा नदीच्या काठी टाहाकारी गावात घेऊन जातो. हे मंदिर खूपच सुरेख असून, पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. मात्र, या मंदिरात तथाकथित जीर्णोद्धाराच्या नावाखाली गावातल्या प्रगतिशील (?) कारभाऱ्यांनी कॉंक्रिटचे खांब आणि वरून तसलेच घुमट उभारले आहे. त्यामुळे गावात शिरताना नदीच्या अलीकडून हीच ती मंदिरे असल्याची खात्री पटत नाही, पण अंतःपुरात मंदिर मोठे नेत्रदीपक होते. चोहोबाजूंनी शिलाखंडांनी बांधलेल्या पुरुषभर उंचीच्या भिंतींनी आवार बंदिस्त केलेले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. या गावासह सभोवतालचे हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवतात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण चिऱ्यांनी बांधलेले आहे. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असून, मंदिरात बहात्तर दगडी खांब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मूर्तीला अठरा हात आहेत आणि त्यांत विविध प्रकारची आयुधे आहेत.

या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून, ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मूळ मूर्तीच्या पुढे तांदळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही बाजूस-पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मूर्ती आहेत. हे मंदिर यादवकालीन असल्याचे म्हटले जाते. मंदिराचा मूळ कळस ढासळून जीर्णोद्धारात पाच नवीन कळस बा॔धल्याचे दिसते.

सभामंडपाच्या छताचा आणि शिल्पकलेचा हा एक सर्वोत्तम नमुना. आठ व्याल आणि स्त्रीरूपातील अष्टदिक्पालांनी तोलून धरलेले छत. छताच्या मधोमध दगडात कोरलेले आश्चर्य म्हणजे लटकते दगडी एकसंध झुंबर. ते आजही उत्तम अवस्थेत आहे.

सभामंडपाच्या बाह्यभागात बरीच मैथुनशिल्पे कोरलेली असून, मंदिरसमूहाच्या बाह्यभिंतींवर देवादिकांची अतिशय प्रमाणबद्ध शिल्पे आढळतात. मंदिराची आधीची शिखरे विटांमध्ये बांधली असल्याने कालौघात ती नामशेष झाली आणि त्यावर सध्याची कॉंक्रिटची शिखरे चढवली गेली आहेत. तरीही या मंदिराचे सौंदर्य अबाधित राहिले आहे. उत्तमोत्तम छताचे शिल्पकाम, मैथुनशिल्पे, लाकडी मूर्ती, कोरीव शिळास्तंभ या वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर चुकवू नये असेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com