भटकंती : कणेरी मठ, कोल्हापूर - ग्रामसंस्कृतीचे केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणेरी गावातील सिद्धगिरी मठ हा ग्रामसंस्कृतीचे केंद्र आहे. ही संस्कृती जपण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करून मठाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्रामसंस्कृतीबरोबर सेंद्रिय शेतीचे वैविध्य पाहायचे झाले, तर या मठाला भेट द्यायलाच हवी.

कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणेरी गावातील सिद्धगिरी मठ हा ग्रामसंस्कृतीचे केंद्र आहे. ही संस्कृती जपण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करून मठाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्रामसंस्कृतीबरोबर सेंद्रिय शेतीचे वैविध्य पाहायचे झाले, तर या मठाला भेट द्यायलाच हवी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामजीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कणेरी (ता. करवीर) या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. दोनशेहून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे. मठ म्हटले, की आपल्या डोळ्यांपुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा-अर्चा आदी प्रकार. परंतु, कणेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनाची झलक तर इथे पाहावयास मिळतेच; परंतु सेंद्रिय शेतीबाबत अनोख्या पद्धतींचे संशोधन येथे केले जाते. कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळा, जोतिबा, अंबाबाई मंदिर याप्रमाणे आता कणेरीमठाचे स्थान पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी आले आहे. कणेरीमठाला प्राचीन धार्मिक परंपरा आहे. एका टेकडीवर दाट झाडीत हा रमणीय परिसर आहे.

या ठिकाणचे सिद्धगिरी म्युझियम पाहण्यासारखे आहे. आपण एका खेडेगावात उभे असल्याचा अनुभव येतो. बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले; तरी ही बलुतेदारी म्हणजे काय? तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे, इतकी जबरदस्त कारागिरी शिल्पकारांनी केलेली आहे. हे म्युझियम पाहताना जणू आपण जिवंत कारागिरांच्या घरीच जाऊन पाहतोय, असा भास होतो. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतातील घराच्या प्रतिकृतीही विलोभनीय आहेत. म्युझियम पाहण्याच्या सुमारे एक तासाच्या या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा आभास होतो. या ठिकाणी चारही वेद, आयुर्वेद यावर आधारित शिल्पे लक्ष वेधून घेतात.

मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे दोनशे देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या, मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना मठाच्या वतीने करण्यात आली आहे.

कसे जाल? 
कोल्हापूर गोकूळ-शिरगाव रस्त्यावर कणेरीमठाचा फाटा आहे. तिथून जाता येते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write on Tourism Kaneri Math Kolhapur