ट्रेकिंगला जाताय? मधमाश्‍यांपासून सावधान!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

काय काळजी घ्यावी 
मधमाशा नेहमी उघड्या अंगावर हल्ला करतात. याकरिता फूल शर्ट व पॅंट घालावी. 
खिशात स्कार्फ ठेवावा. त्याने पूर्ण तोंड झाकता येते. कॉटनचे हातमोजेही घालावेत.
मधमाश्‍यांनी हल्ला केल्यास अगदी शांत उभे राहावे, अजिबात हालचाल करू नये. मधमाशा अंगावर बसल्यातरी झटकून टाकू नये. आहे त्या परिस्थितीत स्तब्ध राहावे. 

प्राथमिक उपचार 
मधमाशी हल्ला झाल्यानंतर प्राथमिक उपचाराने मोठा फरक पडतो. 
मधमाशीचे विष ॲसिटिक असते. त्यामुळे लिक्विड अमोनियाची बाटली प्रत्येक ग्रुपसोबत असणे गरजेचे आहे. 
मधमाश्‍यांचा काटा काळ्या रंगाचा असतो. मधमाशी चावल्यास काटा नखाच्या चिमटीत पकडून खेचावा अथवा नखाने खरडावा. त्यामुळे तो तुटतो व स्नायू काम करतात, म्हणजे काट्याचे विष काट्यातच  राहते.
काटा खरवडल्यानंतर त्या ठिकाणी अमोनियाचा एक थेंब टाकावा व नखाने खरडवावे, म्हणजे औषध आत शिरेल व विष नष्ट होईल.

काय करू नये
किल्ल्यावर जाताना पर्यटकांनी भडक रंगाची कपडे परिधान करू नये.
कपड्यावर किंवा अंगावर सेंट, परफ्युमचा वापर करू नये.
किल्ल्यावर धूम्रपान करू नये.
मधमाश्‍यांच्या पोळ्याजवळ जाऊ नये व त्याठिकाणी धांगडधिंगा करू नये.
किल्ल्यावर धूर करू नये.

दुर्गभ्रमंती व ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी वेल्हे तालुक्‍याचे मोठे आकर्षण आहे. येथील स्वराज्याचे तोरण उभारलेला किल्ले तोरणा, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड व लिंगाना किल्ल्याकडे इतिहासप्रेमींची पावले आपोआप वळतात. परंतु, तोरणा व राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्‍यांनी केलेल्या हल्ल्यामुळे निसर्गाचा आनंद निसर्गाच्या नियमांचे पालन करूनच घ्यावा, असा धडा दिला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मधमाशीच्या शेपटाकडील भागात असलेल्या काट्यात विष असते. केसाएवढ्या असणाऱ्या या काट्याचा आकार बास्तिक बाणासारखा असतो. मधमाशीने डंख मारल्यानंतर हा काटा आपल्या शरीरात बाणासारखा रुतून बसतो. तिला तो काटा खेचून काढता येत नाही, शेवटी तिच्या प्रयत्नानेच तो तुटतो. काटा वेगळा झाल्यामुळे मधमाशी काही तासातच मरते. मात्र, काटा मधमाशीपासून वेगळा झाल्यानंतर त्यातील स्नायू मजबूत होतात व स्नायू आकुंचन प्रसरण पावतात व काट्यातील विष शरीरात पसरते. खूप मधमाश्‍या चावल्या तर जास्त विषाने प्रथम डिसेंन्ट्री व काही वेळातच उलटी होते. यासाठी त्वरित उपचार करणे गरजेचे असते.

हल्ल्याची कारणे
मधमाशा का व केव्हा चवतळतात? याचा अजूनही शोध लागलेला नाही. मात्र, वाऱ्यामुळे गवत उडून त्याचा पोळ्याला फटका बसला; तरी मधमाशा उठतात. वातावरणातील अचानकच्या बदलामुळे त्या चवतळतात. त्यांच्या हल्ल्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, हिवाळा ऋतू हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो. या कालावधीमध्ये त्यांच्या पोळ्यास धक्का लागल्यास ते जवळपास असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला करतात.

तोरणा व राजगड किल्ल्यावरील मधमाश्‍यांच्या हल्ल्यामुळे गेल्या महिन्यात अनेक पर्यटक जखमी झाले; तर किल्ले राजगडावर एका पर्यटकाचा मधमाशींच्या चाव्यापासून संरक्षण करताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. त्यामुळे ट्रेकिंगसाठी जाताना कोणती काळजी घ्यायला हवी? मधमाश्‍यांचा हल्ला झाला तर काय करावे व काय करू नये? हेही माहिती असणे गरजेचे आहे. त्यातून ट्रेकिंग व पर्यटनाचा खरा आनंद घेता येईल.
- मनोज कुंभार, वेल्हे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of bees going trekking