सिन्नरचं देखणं गोंदेश्‍वर मंदिर

अरविंद तेलकर
Friday, 15 November 2019

कसे जाल? -
पुण्याहून मंचर, संगमनेरमार्गे सिन्नर सुमारे १८३ किलोमीटर, मुंबईहून आसनगाव-इगतपुरीमार्गे सुमारे १९३ किलोमीटर, नाशिकहून ३५ किलोमीटर. 
नाशिकमध्ये निवास करूनही सिन्नरला जाता येतं. सिन्नरमध्येही निवास आणि भोजनाची व्यवस्था आहे. पुणे, मुंबई, नाशिक तसंच अन्य ठिकाणांहूनही राज्य परिवहन सेवेच्या बस उपलब्ध आहेत. खासगी आरामबसचाही पर्याय आहे.

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
भारतीय स्थापत्यशैलीचा ज्ञात इतिहास सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही देशातली आद्यसंस्कृती समजली जाते. त्या काळातही भारतीय वास्तुकला उच्चकोटीची असल्याचं, पुरातत्त्व खात्यानं केलेल्या उत्खननात आढळून आलं आहे. नंतरच्या काळात वास्तूशैलीमध्ये अधिकाधिक विकास होत गेला.

ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात तत्कालीन मगध (सध्याचं बिहार) साम्राज्याचा विकास झाला. राजगृह या राजधानीच्या नगरात वास्तुकलेचे विविध प्रकार उदयास आले. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात याच प्रदेशात मौर्यांचं साम्राज्य उदयास आलं. कपिलवस्तू, कुशीनगर, उरुबिल्व अशी मोठी नगरं उदयास आली. वास्तुकलेला राजाश्रय मिळाल्यानं अनेक स्तूप, चैत्य, विहार, स्तंभ आणि गुहामंदिरांची निर्मिती झाली. आधी दगड, नंतर भाजलेल्या विटा आणि नंतर बांधकामामध्ये लाकडाचाही वापर होऊ लागला.

मगधमधल्या वास्तुशैलीचा विस्तार थेट महाराष्ट्रातल्या कण्हेरी (मुंबई) जुन्नर (पुणे जिल्हा), अजिंठा आणि वेरूळ (औरंगाबाद) आणि गांधारपर्यंत (सध्याचं कंदाहार, अफगाणिस्तान) झाला होता. राजमहाल आणि धनिकांचे महाल, समाधी, गिरीदुर्ग आणि भुईकोट, कलात्मकतेनं सजलेल्या विहिरी (बावडी) आणि नद्यांवरच्या घाटांमध्ये ही वास्तुशैली दिसत होती. उत्तरेत एक विशिष्ट शैली प्रमाण मानली जाऊ लागली, तर दक्षिणेत वेगळ्या पद्धतीच्या गोपुर या वास्तुशैलीचा विकास झाला होता. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासूनच मंदिरांवरच्या शिखरांना महत्त्व प्राप्त झालं. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव सम्राटांपैकी रामचंद्रदेवराय यांच्या कारकिर्दीत हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हे १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान होते. ते उत्तम वास्तुशिल्पकारही होते. दख्खनच्या पठारावर त्यांनी विकसित केलेल्या शैलीत अनेक मंदिरांची उभारणी झाली. अशी मंदिरं हेमाडपंती म्हणून प्रसिद्ध झाली.

हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणजे वेरुळचं घृष्णेश्‍वर मंदिर आणि औंढा नागनाथ मंदिर. दगडी बांधकाम करताना चुन्यामध्ये विविध प्रकारची घटकद्रव्यं वापरून तयार केलेल्या दर्जाचा वापर केला जात असे. हेमाडपंती पद्धत सर्वस्वी वेगळी होती. यात चुन्याचा वापर करण्यात येत नव्हता. दगडांना खाचा आणि खुंट्या करून, ते एकमेकांत गुंतवले जात.

पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफले जात आणि एकसंध रचना उभी राहत असे. या पद्धतीमुळं संपूर्ण बांधकाम भक्कम आणि टिकाऊ बनतं. आजही अशी मंदिरं पाहता आणि अभ्यासता येतात. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमधलं गोंदेश्‍वराचं मंदिर भूमिज पद्धतीचं आहे. यादव राजपुत्र राजगोविंद यानी हे मंदिर बांधल्याचा इतिहासात उल्लेख आहे. हे मंदिर १२५ फूट लांब आणि ९५ फूट रुंद आहे. प्राकारात एकूण पाच मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैवपंचायतन असं म्हटलं जातं.

गोंदेश्‍वराचं मुख्य मंदिर मध्यभागी आहे. आवारातल्या चारही उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूची मंदिरं आहेत. मुख्य मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, असे तीन भाग आहेत. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गाभाऱ्यावर मंदिराचं नगारा पद्धतीचं शिखर आहे. त्यावर उत्कृष्ट कोरीवकाम करण्यात आलं आहे. सभामंडपातील स्तंभ विविध प्रकारच्या नक्षीनं सजवण्यात आले आहेत. स्तंभांवर आणि सभामंडपाच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व आणि अप्सरा तसंच रामायण आणि पौराणिक प्रसंग कोरण्यात आले आहेत. मंदिरातील शिल्पकृती त्रिमिती पद्धतीची आहे.

परावर्तित प्रकाश आणि सावल्यांमुळं, ती अधिकच उठावदार दिसतात. मुख्य मंदिरासमोर नंदी आहे. मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळात दोन लाख रुपये खर्च आला होता. मंदिराभोवती भिंत होती. मात्र आता ती नष्ट झाली आहे. राजपुत्र राजगोविंद यानंच सिन्नर वसवलं होतं. गोंदेश्‍वराशिवाय इथं ऐश्‍वर्येश्‍वराचंही मंदिर आहे. सिन्नरपासून जवळच देवपूर गावातला राणेखान वाडाही प्रसिद्ध आहे. संत बाबा भागवत महाराजांनी याच गावात संजीवन समाधी घेतली होती. गोंदेश्‍वर आणि ऐश्‍वर्येश्‍वर ही दोन्ही मंदिरं पुरातत्त्व खात्यातर्फे संरक्षित म्हणून घोषित करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk tara sutaria maitrin supplement sakal pune today