'हे' तीन दिवस वासोट्याच्या ट्रेकींगला बंदी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

व्याघ्रं प्रकल्प व बामणोली वन्यजीव वन क्षेत्रातील किल्ले वासोटा पर्यटनस्थळ हे बफर व कोअर क्षेत्रात येते. येथे कोणत्याही प्रकारचा कचरा करणे, मद्यपान करणे, वनास किंवा वन्यप्राण्यास इजा होईल असे कोणतेही वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येते.

कास (जि. सातारा) : दुर्गप्रेमींचे ट्रेकींगसाठीचे आवडते ठिकाण असलेला एैतिहासिक वासोटा किल्यावरील ट्रेकींग सोमवारपासून (ता. 31) बुधवारपर्यंत (ता. 1) तीन दिवस बंद राहणार आहे. वन विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

हेही वाचा - वासोट्याचा धम्माल नाइट ट्रेक...

बामणोली खोऱ्यातील घनदाट जंगलाने व्यापलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात वासोटा किल्ला येतो. पावसाने उघडीप घेतली की साधारणतः ऑक्‍टोबरनंतर वासोट्याच्या ट्रेकींगला सुरूवात होते. हा किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात येतो. बामणोलीतील वन्यजीव विभागाच्या परवानगीशिवाय या राखीव क्षेत्रात प्रवेश करता येत नाही.

हंगामाच्या सुरूवातीलाच वन विभागाने बामणोली येथून वासोट्याला परवानगी देणार नसल्याचे सांगितले. त्यातून स्थानिक ग्रामस्थ व वन विभागामध्ये विसंवाद निर्माण झाला. शेवटी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने वासोट्याच्या पायथ्यालाच मेट इंदवलीपर्यंत परवानगी देवून हंगामाला सुरूवात झाली. पण त्यामध्येही प्रशासन व स्थानिकांच्या संघर्षात हंगाम एक महिना उशिरा सुरु झाला. हंगाम सुरू झाल्यावर पर्यटकांचे लोंढे वासोट्याकडे जात आहेत. विशेषतः शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी ही गर्दी हजाराच्या घरात जात आहे.

जरुर वाचा - ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...

वासोट्याचा हा हंगाम कोयना जलाशयातील पाणीसाठा मुबलक असेपर्यंत सुरू असतो. पण पर्यटक विशेषतः थंडीच्या दिवसातच ट्रेकींगला प्राधान्य देत नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान गर्दी करतात. उन्हाळा वाढू लागला की पर्यटकांची संख्या कमी होते. कोयनेच्या शिवसागर जलाशयातील बोटीच्या प्रवासाचा आनंद घेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रातील घनदाट जंगलातील पायवाटेचा हा वासोटा ट्रेक संस्मरणीय होत असल्याने पर्यटकांची पसंती मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

वन विभागाचा कारवाईचा इशारा

व्याघ्रं प्रकल्प व बामणोली वन्यजीव वन क्षेत्रातील किल्ले वासोटा पर्यटनस्थळ हे दरवर्षीप्रमाणे 30, 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी बंद ठेवण्यात आले आहे. बफर व कोअर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा कचरा करणे, मद्यपान करणे, वनास किंवा वन्यप्राण्यास इजा होईल असे कोणतेही वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बामणोलीचे वन परिमंडल अधिकारी सागर कुंभार यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department Banned Three Days For Vasota Fort Trekking Satara Marathi News