थ्रिल ‘रिव्हर राफ्टिंग’चे... 

मयूर जितकर 
Friday, 15 May 2020

पुण्या-मुंबईहून एक दिवसाच्या मिनी बजेट आणि थ्रिलिंग  ट्रिपसाठी कोलाड योग्य ठिकाण आहे. वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या  वेगवेगळ्या ऋतूत रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेता येतो. 

‘यंगस्टर्स’कडून हल्ली पर्यटनासाठी वेगळ्या ठिकाणांना पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील कोलाड हेही ऑफबीट ठिकाणांमध्ये प्रसिद्ध आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशा समृद्ध निसर्गामध्ये कुंडलिक नदीच्या काठावर वसलेले कोलाड रिव्हर राफ्टिंगसाठीही चांगले ठिकाण आहे. विशेष म्हणजे, वर्षभर राफ्टिंग करता येणारे हे भारतातील एकमेव ठिकाण आहे.

महाराष्ट्र सरकारनेही येथील रिव्हर राफ्टिंगला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही याबद्दल माहिती दिली आहे. येथील कुंडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग केले जाते. दररोज जवळील भिरा धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे, आपसूकच रिव्हर राफ्टिंगसाठी अनुकूल परिस्थिती तयार होते. मात्र, त्यासाठी पर्यटकांना नियोजित वेळ पाळावीच लागते. राफ्टिंगच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास हजर राहावे लागते. त्यानंतर, महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात.

.ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुंडलिका नदीतील साधारणपणे १४ किलोमीटरच्या पट्ट्यात राफ्टिंग करण्याचा थ्रिलिंग अनुभव घेता येतो. मात्र, रिव्हर राफ्टिंग हा धाडसी खेळ समजला जातो. त्यामुळे, लाईफ जॅकेट व इतर आवश्यक साधने व काळजी घेऊनच ते करावे. स्थानिकांच्या व गाईडच्या सूचनांचे पालनही आवश्यकच. पोहता न येणाऱ्यांनी शक्यतो ते टाळलेलेच बरे. रिव्हर राफ्टिंगबरोबरच रॅपलिंग, जंगल कॅम्पिंग, एरोमॉडेलिंग आदींचा रोमांचक अनुभवही कोलाडला घेता येतो. पुण्या-मुंबईहून एक दिवसाच्या मिनी बजेट आणि थ्रिलिंग ट्रिपसाठी कोलाड योग्य ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीत तंबू ठोकून राहण्याचा अनुभवही तुम्ही घेऊ शकता. वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या वेगवेगळ्या ऋतूत रिव्हर राफ्टिंगचा वेगवेगळा अनुभव घेता येतो. 

काय पाहाल? 
- कुंडलिका नदी 
- कोलाड धरण 
- भिरा धरण 
- सुतारवाडी सरोवर 

कसे जाल? 
कोलाड कोकणात असले, तरी मुंबईहून जवळ आहे. मुंबईहून अगदी दोन तासांमध्ये कोलाडला रेल्वे किंवा रस्तामार्गे जाता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayur jitkar writes article about thrill of river raftings