डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर

बाळकृष्ण मधाळे
Monday, 27 July 2020

सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर मंदिरातील महादेव हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. याची ख्याती राज्यभर असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी येतात. 

श्रावण महिना हा सर्वानाच हवाहवासा वाटणारा पवित्र महिना. श्रावणातील साेमवारी भाविक माेठ्या भक्तीभावाने महादेवाच्या मंदिरांमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतात. सातारा शहरच्या पश्‍चिमेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर यवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. येथे यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत काळभैरवनाथचे देवस्थान आहे. त्या देवाची यात्रा ही या भागातील सर्वांत पहिली यात्रा असते.

हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत. शेजारी काळभैरवनाथाचे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती द्रविडीयन पध्दतीची असून मंदिराच्या कळसाची आतील बाजू पाहण्यासारखी आहे. या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत एक विरगळ ठेवला आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात इतरही काही मूर्ती ठेवलेल्या आढळतात. मंदिराच्या पश्‍चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते. या तळ्याची बांधणी जांभ्या दगडातील वेगळ्या पध्दतीची असून सध्या या तलावात जास्त पाणी टिकत नाही.

यवतेश्वर डोंगराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1230 मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढ्याचा भैरोबा म्हणतात. काहींच्या मते छत्रपती शाहू महाराजांनी यवतेश्वर येथे महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. येथूनच दूरवर कण्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वर व मेरुलिंगाचे दर्शन घडते. सभोवती गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते. डोंगरावरून सातारा शहराचे विहंगम दृश्‍य व अजिंक्‍यताऱ्याची दर्शनी बाजू नजरेच्या टप्प्यात येते. साताऱ्यातून दर अर्ध्या तासाला येथे येण्यासाठी एसटी, तसेच खासगी वाहनाची सोय आहे.

या देवस्थानाची यात्रा दरवर्षी अश्विन अमावस्येला भरते. या यात्रेची सर्व जबाबदारी यवतेश्वर, सांबरवाडी, आंबेदरे येथील ग्रामस्थ पार पाडत असतात. पालखीची भव्य अशी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघून ती पालखी मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या देवाच्या आंब्याच्या झाडाजवळ जावून त्या झाडाचे पूजन केले जाते. या देवाच्या आंब्याच्या झाडाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदिवशी झाडाला एका दिवसात मोहोर येऊन पूजन झाल्यानंतर आंबे येतात. झाडाचे पूजन केल्यानंतर गावातील देवाचा भक्त त्या झाडावर चढून झाडाला आलेली आंब्याच्या मोहोराची फांदी तोडून खाली आणून ती पालखीत ठेवली जाते. तेथून पालखी व त्या भक्ताला खांद्यावर घेऊन पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे वाजत गाजत रवाना होते. या आंब्याचा मोहोर व आंबा आला की यात्रा झाली, असे मानले जाते.

श्रावण महिन्यात या मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 
दरम्यान, यवतेश्वरावर बऱ्यापैकी झाडी असल्याने थंडावा नेहमीच असतो. येथून जरंडेश्वर, अजिंक्‍यतारा, मेरूलिंग डोंगररांगा स्पष्ट दिसतात. यवतेश्वराला डावीकडे वळण्याऐवजी तसेच सरळ गेलात की, अंदाजे 18 ते 20 किलोमीटरवर आपण एका मोठ्या तलावाशी येऊन पोचतो. हाच तो बहुचर्चित कास तलाव. यवतेश्वर ते कास हा रस्ता म्हणजे, अपरिमित आनंदाचा ठेवा. अनेक प्रकारची आणि रंगीबेरंगी फुलपाखरे, पावसाचे पाणी आकंठ पिऊन तृप्ततेने डवरलेले वृक्ष, असंख्य नवनवी झुडपे आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर हे घाटावरचे जिल्हे पावसाळ्यात नेहमीच असा रूबाब धारण करून असतात. या सर्वांच्या जोडीला भारद्वाज, कोकीळ, बुलबुल, खंड्या, बंड्या, कोतवाल, रॉबिन, दयाळ असे अनेक पक्षी चिमणी-कावळ्यांच्या संख्येने आपली साथ देत असतात. श्रावणात येथील वातावरण अगदी प्रसन्न असते. येथील महादेव अनेकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची ख्याती राज्यभर असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी येतात.

 
कसे जाल?  पुण्याहून सातारामार्गे यवतेश्‍वर 128.8 किलाेमीटर आणि मुंबईहून 271.6 किलाेमीटर 

मुक्कामाची सोय : सातारा शहरात अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. साताऱ्यातील मुक्कामात  किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, बामणोली, चाफळ, पाटेश्वर आदी ठिकाणं पाहता येतील. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Article About Yavateshwar Lord Shiva Temple