भटकंती  : स्वच्छ आणि सुंदर : काशीद बीच 

मयूर जितकर 
शुक्रवार, 29 मे 2020

अलिबागमधील हा समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे.पांढरी वाळू,निळाशार समुद्रकिनारा,हिरवी पर्वतराजी ही काशीद बीचची वैशिष्ट्ये.अलिबागला येणारे जास्तीत जास्त पर्यटक काशीद बीचला भेट देतात.

कोकण म्हटले की नितांतसुंदर समुद्रकिनारे, माडापोफळीच्या बागा, हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर येतो. अलिबागमधील हा समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. पांढरी वाळू, निळाशार समुद्रकिनारा, हिरवी पर्वतराजी ही काशीद बीचची वैशिष्ट्ये. तो दोन टेकड्यांदरम्यानच्या तीन किलोमीटर लांबच्या या बीचचे पाणीही तितकेच स्वच्छ आहे. पर्यटकांची गजबज असली, तरीही हा समुद्रकिनारा शांत असतो. अलिबागला येणारे जास्तीत जास्त पर्यटक काशीद बीचला भेट देतात. हा बीच इतका सुंदर आहे की, सौंदर्याच्या बाबत त्याची गोव्यातील बीचशी तुलना केली जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मॉन्सूनव्यतिरिक्तच्या काळात या बीचवर पाचसहा फुटांपर्यंतच्या लाटा उसळतात. त्यामुळे, ‘यंगस्टर्स’मध्येही काशीद बीच विशेष लोकप्रिय आहे. मात्र, पुरेशी सावधगिरी न बाळगता सर्फिंग करू नये. गाईड किंवा स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवास सर्फिंगचे धाडस करू नये. त्यासाठी पूर्वानुभही महत्त्वाचाच. पावसाळ्यात येथील समुद्रकिनारा खवळलेला असतो. रिसॉर्ट किंवा स्थानिकांच्या घरात मुक्काम व आहाराची सोय होऊ शकते. रिसॉर्टपेक्षा घरामध्ये राहण्याचा पर्याय निवडावा. ते परवडण्याजोगे आहे. कोकणातील मासे व इतर पारंपारिक पदार्थांचा घरगुती आस्वाद घेता येतो. मुंबईबरोबरच पुण्यापासूनही तो जवळ आहे. त्यामुळे, शहरी धावपळीतून ‘ब्रेक’ घेऊन मजा करण्यासाठी, रिफ्रेश होण्यासाठी पर्यटक या बीचला भेट देतात. एखाद्या वीकेंडला अवघ्या दोन दिवसांत तुम्ही काशीद बीचला जाऊन येऊ शकता. या बीचपासून मुरुड जंजिरा किल्ला जवळच असून तुम्ही त्यालाही भेट देऊ शकता. 

कसे जाल? 
- मुंबईत गेट वे ऑफ इंडियावरून लाँचने समुद्रमार्गे अलिबागला जाता येते. त्याचप्रमाणे, मुंबई सेंट्रल बस स्थानकावरून एसटीनेही जाऊ शकता. खासगी गाडीचा पर्याय आहेच. 
- अलिबागवरून रिक्षा किंवा बसने काशीद बीचला जाता येते. मुंबईहून तो १३५, पुण्याहून १७५ तर अलिबागहून ३० किलोमीटरवर आहे. पुण्याहून अलिबागला बस किंवा खासगी वाहनाने जाता येते. 

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ 
- ऑक्टोबर ते मार्च 

काय पाहाल/अनुभवाल? 
- आकर्षक समुद्रकिनारा 
- बिर्ला मंदिर 
- हॉर्स रायडिंग 
- बोटिंग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourism article about kashid beach