फिरायला जायचंय मग बॅग कशी भराल, वाचा या टिप्स

पंकज झरेकर 
Friday, 17 April 2020

नेटकी पॅक केलेली बॅग सोबत असल्यास भटकंती फक्त सामानवाहू ट्रिप न बनता आनंददायी सुखाचे क्षण गाठीशी बांधणारा आयुष्याचा ठेवा बनून जाते.  बॅगव्यतिरिक्त हाताशी लागणारे सामान एका लहान हँडबॅगमध्ये ठेवावे.

भटकंतीचे ठिकाण निश्‍चित झल्यावर किती दिवसांचा प्लॅन आहे, त्यानुसार सामानाची बांधाबांध करावी. पॅकिंग करताना शक्यतो एक, दोन ते तीन, पाच सहा दिवसांच्या ट्रिपसाठी काय काय सामान लागते, याची यादी कायम हाताशी तयार ठेवावी. त्यात कारने किंवा बाईकने करायची ट्रिप आल्यास तसे बदलही करावेत. कपडे शक्यतो पॅकिंग करताना हलके, सुती किंवा होजिअरीचे टी-शर्ट असावेत. जीन्ससारखे प्रकार टाळावेत. प्रवासात हवेशीर आणि हलके कपडे असावेत. ट्रॅकपँट, टी-शर्ट, शॉर्ट पँट प्रवासात वापरास सोयीस्कर ठरतात. लहान मुलांच्या कपड्यांची वेगळी बॅग करावी, एक जोड कायम हाताशी हॅन्डबॅगमध्ये ठेवावा. किती कपडे घ्यावेत हा वैयक्तिक भाग आहे, पण दिवसाला एक जोड आणि रात्री वापरण्यासाठी एक असावाच.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऋतू आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून उन्हाची टोपी, स्वेटर, मफलर, पावसाळ्यात छत्री अशी कालानुरूप जोड असावी. हे सर्व बॅगमध्ये भरताना घडीऐवजी रोल केल्यास त्याने कमी जागा व्यापली जाते. स्थळदर्शनात बूट घालणार असल्यास एखादी स्लिपर नक्की बॅगमध्ये ठेवावी. ट्रेक किंवा जंगल ट्रेलसारख्या ॲक्टिव्हिटी असल्यास पूर्ण बाह्यांचे कपडे, चांगले बूट आणि आयोजकांनी सांगितलेली साधने यांचा समावेश आठवणीने करावा. बॅगमध्ये पेस्ट, साबण, ब्रश, नेलकटर अशा वस्तू असलेले टॉयलेट किट असावे. ते सहज हाताशी लागेल अशा हवाबंद डब्यात किंवा पाऊचमध्ये असावे. हार्ड लगेज टाइप म्हणजे कडक सुटकेससारखी बॅग न घेता डफलबॅग किंवा सॉफ्ट लगेजसारखी बॅग घ्यावी. कुटुंबातील सदस्यांची एकच मोठी बोजड बॅग करण्याऐवजी विभागून दोन किंवा तीन बॅगा कराव्यात, ज्या हाताळायला, उचलायला सोयीस्कर ठरतात. कुठलीही बॅग पॅक करताना ती तिच्या क्षमतेच्या साधारण ९० टक्के भरावी. या सर्व बॅगव्यतिरिक्त हाताशी लागणारे सामान एका लहान हँडबॅगमध्ये ठेवावे. त्यात नेहमीचे लागणारे पैसे, हातरुमाल, कायम लागणारी औषधे, फळे कापण्यास लागणारा लहान चाकू, पाचसहा पेपर प्लेट, नॅपकिन, लिक्विड सोप किंवा फेसवॉश, सॅनिटायझर, जुजबी प्रथमोपचाराचे साहित्य असावे. 

या सर्व बॅगवर आपल्या नावाचे लेबल लावावे आणि कुठल्या बॅगमध्ये काय ठेवले आहे, याची एक यादी बनवून दोन सदस्यांकडे ठेवावी. प्रवासात किंवा पर्यटनस्थळी आपण भेटवस्तू, स्थानिक वैशिष्ट्ये असलेले कपडे किंवा अन्य काही खरेदी करतो. अशा वस्तू सुरक्षित घरी आणण्यासाठी वेगळ्या घडीच्या बॅग सोबत बाळगाव्यात. नेटकी पॅक केलेली बॅग सोबत असल्यास भटकंती फक्त सामानवाहू ट्रिप न बनता आनंददायी सुखाचे क्षण गाठीशी बांधणारा आयुष्याचा ठेवा बनून जाते. पुढील भागात आपण प्रवासादरम्यान घ्यायच्या काळजीसंबंधी थोडं पाहूया. तूर्तास या कोरोनाच्या संकटाला हरवण्यासाठी घरातच राहून पुढील भटकंतीचे बेत आखा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism tips on bag packing

Tags
टॉपिकस
Topic Tags: