भटकंती : विदर्भाचे नंदनवन : चिखलदरा

मयूर जितकर
Friday, 1 May 2020

कसे जाल?
राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर  अमरावती आहे. अमरावतीपासून चिखलदरा ९४ किलोमीटर अंतरावर असून अमरावतीवरून एसटीने चिखलदऱ्याला जाता येते.

रेल्वेमार्गे : मुंबई-हावडा या मुख्य लोहमार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून एसटीने अमरावतीला जावे लागते.

प्रेक्षणीय ठिकाणे

  • इको पॉइंट
  • देवी पॉइंट
  • नर्सरी गार्डन
  • प्रॉस्पेट पॉइंट
  • सनसेट पॉइंट
  • हरिकेन पॉइंट
  • भीमकुंड

थंड हवेचे ठिकाण म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर महाबळेश्‍वर, पाचगणी येते. मात्र, महाराष्ट्रात इतर भागातही थंड हवेची सुंदर ठिकाणे आहेत. त्यांना भेट द्यायलाच हवी. विदर्भाला नैसर्गिक साधनसंपत्तीचे विपुल वरदान लाभलेय. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सातपुड्याच्या एकूण सात पर्वतरांगा आहेत. त्यापैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाटचा परिसर व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण अशी चिखलदराची ओळख आहे. येथील दऱ्या हजारो फूट खोल आहेत. एका दरीच्या वरील भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केल्याने त्याला ‘भीमकुंड’ असे नाव पडले, असे म्हणतात. येथे मोर, अस्वले, रानकोंबड्या, हरिण हे प्राणीही मुक्तपणे बागडत असतात. चिखलदऱ्याचा परिसर शुष्क पानझडी वनाच्या प्रकारात येतो. त्यामुळे, उन्हाळ्यात येथे पानझड सुरू होते. येथील शक्कर तलाव, मछली तलाव, देवी तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) ही चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यानंतर पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विराट देवी हा पॉइंटही प्रसिद्ध आहे. चिखलदऱ्यापासून ११ किलोमीटर अंतरावर डोंगरावर विराट देवीचे मंदिर आहे. चिखलदऱ्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर बहामनी किल्ला आहे. आपण हा किल्लाही पाहू शकतो. तो पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. या किल्ल्यात जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा आहेत. किल्ल्याची दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. उन्हाळ्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून तर चिखलदरा लोकप्रिय आहेच. याशिवाय, पावसाळ्यातील सुंदर धबधबे, ढगांमध्ये हरवलेल्या पर्वतरांगांमुळे चिखलदरा अतिशय विलोभनीय दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism Vidarbha Chikhaldara