‘मास्कड बुबी’चा शिकार शो!

Masked booby bird
Masked booby birdsakal media
Updated on

खोल समुद्रात पक्ष्यांचे छायाचित्रण करणे म्हणजे कसरतच, पण अरबी समुद्रात अशीच एक टूर अलीकडेच केली. या टूरमध्ये अत्यंत दुर्मिळ मास्कड बुबी (समुद्री कावळा) भेटला. त्याच्यापासून आम्ही अगदी १५-२० मीटरवर असताना अचानक त्याने पाण्यात सूर मारला. मासा पकडला. क्षणात पकडलेला मासा हवेत उडवला. नंतर गिळून टाकला. त्याच्या अशा २० मिनिटांच्या शिकारीच्या शोचे आम्ही साक्षीदार झालो.

वन्यजीव छायाचित्रणाला ठाणे खाडीतील पाणपक्षी बघता-बघता सुरुवात झाली. २०११ ते २०१६ सलग सहा वर्षे महिन्यातून किमान तीन-चार वेळा ठाण्याच्या खाडीत छोट्या होडीतून पक्षी निरीक्षण व छायाचित्रण केले. तो काळ ठाणे खाडी अभयारण्य घोषित होण्यापूर्वीचा. त्यावेळी ठाणे खाडीत पक्षी दिसतात, हे अनेकांना माहीत नसल्यामुळे तिथे फारसे कुणी येत नसे. एकदा असेच पक्ष्यांचे छायाचित्रण करत करत ठाण्याहून उरणपर्यंत पोहोचलो. वाटेत काही कैकर (ऑस्प्रे) जातीचे गरूड पक्षी होते. खाडी संपून पुढे अरबी समुद्र सुरू होतो. त्यामुळे आम्ही माघारी परतलो; पण मनात एक प्रश्न येत राहिला, समुद्रात हेच पक्षी असतील की अजून वेगळे?

अधिक अभ्यास सुरू झाला. त्यानंतर कळले की, खोल समुद्रात असणारे पक्षी सहसा किनाऱ्यावर येत नाहीत व त्यांना पाहायचे असेल तर खोल समुद्रात जावे लागेल. यालाच पेलाजीक टूर असे म्हणतात. ही टूर तशी खूप आव्हानात्मक असते. त्यामुळे फार लोक याच्या वाट्याला जात नाहीत. बऱ्याच लोकांना समुद्र लागतो (सी सिकनेस), उलट्या, चक्कर, गरगरणे असे प्रकार होतात. छोट्या किंवा मध्यम आकाराच्या होडीतून जावे लागते. बोट प्रचंड हेलकावे खात असते. अशा स्थितीत बोटीत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणेही कठीण होते. नजर पोहोचेल तिथपर्यंत सर्वत्र समुद्राचे पाणीच पाणी दिसते.

सूर्य थेट तुमच्या अंगावर असतो, त्यामुळे ‘सन बर्न’ होते. मळमळते म्हणून पाणी कमी प्यायलात तर डिहायड्रेशनची भीती असते. असे असले तरी समुद्रातील पक्षी पाहण्याची तीव्र ओढ काही स्वस्थ बसू देत नव्हती. २०१७ ला आमचे मित्र विरारचे गुणी पक्षी निरीक्षक अमोल लोपेझ यांच्याशी चर्चा करून, काही मित्रांना सोबत घेऊन अर्नाळा बंदर येथून समुद्रात जायचे ठरवले. एक छोटा ट्रॉलर बुक केला. खोल समुद्रात गेलो होतो. पक्षी फारसे दिसले नाहीत. त्यानंतर अशीच एक टूर करावी असे सतत मनात येत होते, परंतु योग काही येत नव्हता.

या वर्षी गोव्यातील आमचा मित्र पराग रांगणेकर यांना अशा टूरचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या सोबतीने समुद्रात पक्षी निरीक्षण करण्याचा बेत आखला आणि गेल्या महिन्यात दुसऱ्या आठवड्यात १५ जणांसह आम्ही गोवा गाठले. एका मध्यम आकाराच्या बोटीतून वास्को बंदरातून पहाटे सहा वाजताच अरबी समुद्रात प्रवेश केला. सोबत मुबलक प्रमाणात प्यायचे पाणी, बिस्किटे, संत्री, केळी, केक व आमचे मित्र शिवाजी देसाई यांनी भरपूर ऊस आणला होता. समुद्री सफरीवर निघाल्यासारखे वाटत होते. या प्रवासात आम्हाला पहिल्यांदा भेटला समुद्रचोर (स्कुआ) पक्षी. समुद्रात थर्माकोलच्या तुकड्यावर बसलेला त्याचा फोटो काढला.

नंतर अजून काही समुद्री पक्ष्यांची छायाचित्रे टिपली. हळूहळू आमच्यापैकी बरेचसे जरा पेंगू लागले. उलटी होऊ नये म्हणून एवोमीनच्या गोळीचा तो परिणाम होता. मीदेखील बसल्या बसल्या तासभर झोपी गेलो आणि जाग आली ती पराग यांच्या हाकेने... बुबी असे ते ओरडताच सर्वांनी डोळ्यांवर आलेली झोप बाजूला सारत पटापट आपापला कॅमेरा हातात घेतला व दूरवर दिसणाऱ्या मास्कड बुबीला (समुद्री कावळा) आपल्या कॅमेऱ्यात पकडण्याचा प्रयत्न सुरू केला.

हा एक अत्यंत दुर्मिळ असा पक्षी होता. आम्ही सर्व त्याला पहिल्यांदाच पाहत होतो. बोट त्याच्या दिशेने हळूहळू सरकू लागली. बोटीचे हलणे व हेलकावे खाणे यामुळे त्या पक्ष्यावर फोकस करणे फारच कठीण जात होते; पण त्या दिवशी आमचे नशीब फारच जोरदार होते. अगदी त्याच्यापासून १५-२० मीटरवर पोहोचलो तरी तो उडाला नाही व अचानक त्याने पाण्यात सूर मारला. मासा पकडला. क्षणात त्याने तो पकडलेला मासा हवेत उडवला, नंतर गिळून टाकला. काही मिनिटांत पुन्हा दुसरा मासा... हा प्रकार सुमारे २० मिनिटे चालला. त्याला ना आमचे भय ना त्रास. एका अतिदुर्मिळ पक्ष्याचे छायाचित्रण झाले होते. तो उडाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत खोल अरबी समुद्रात वेगवेगळ्या पक्ष्यांचे छायाचित्रण करत राहिलो. मास्कड बुबीचे केलेले छायाचित्रण व त्याच्या सोबतची ती वीस मिनिटे कायम स्मरणात राहणार आहेत, अगदी आयुष्यभर!

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com