esakal | रंगसंवाद : कोकणातील देखणेपणा
sakal

बोलून बातमी शोधा

रंगसंवाद : कोकणातील देखणेपणा

कोकण पर्यटकांना आकर्षित करते, तसेच कलावंतांनाही खुणावते. डोंगरदऱ्यांपासून अथांग समुद्रकिनाऱ्यांपर्यंतचे निसर्गसौंदर्य कोकणात आहे. त्यामुळे या प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या मनात कोकणातील सौंदर्याचे चित्रण तपशीलवार होत असते.

रंगसंवाद : कोकणातील देखणेपणा

sakal_logo
By
महेंद्र सुके

कोकण पर्यटकांना आकर्षित करते, तसेच कलावंतांनाही खुणावते. डोंगरदऱ्यांपासून अथांग समुद्रकिनाऱ्यांपर्यंतचे निसर्गसौंदर्य कोकणात आहे. त्यामुळे या प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या मनात कोकणातील सौंदर्याचे चित्रण तपशीलवार होत असते.

कुणी डोंगरदऱ्यातील पक्ष्यांच्या किलबिलाटावर, तर कुणी केवळ इथल्या झुळझुळ वाहणाऱ्या निर्झर पाण्यावरही आपली कला पेश करत असतात. याच कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्‍यातील किंजवडे गावातील रोहित रवींद्र परब या तरुण रंगलेखकाला समुद्रातील बोटी आकर्षित करणाऱ्या ठरल्या आणि त्यांनी त्या चित्रांत मांडल्या. त्या चित्रांचे प्रदर्शन ९ मार्चपासून मुंबईच्या जे.एम.डी. कलादालनात भरले, मात्र कोरोनाच्या संकटामुळे रसिकांपर्यंत पोचू शकले नाही.

लहानपणापासून कोकणातील अथांग समुद्र आपल्या डोळ्यांत साठवून ठेवणाऱ्या रोहित यांचा विषय हा मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. त्यांच्या चित्रांचा बॅकड्रॉप हा समुद्रातील बोटी असल्या, तरी त्या बॅकड्रॉपच्या अवतीभवतीचा सारा अवकाश हा या प्रदेशातील जीवनजाणीवांशी नाते सांगणारा ठरतो. बोट समुद्रात तरंगत असताना मासेमाऱ्यांचे जीवनही हेलकावे घेत असतात. मासेमारीसाठी दूरवर जाऊन पुन्हा आपला किनारा गाठण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात बोट समुद्रात दिसत असली, तरी तिच्या निमित्ताने मासेमारी करणाऱ्यांचे जगणे आपल्या रंगलेखनातील अवकाशातून चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न रोहित यांनी खुबीने केला आहे.

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या रोहित यांचे शालेय शिक्षण बोरिवली येथील श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालयात झाले. पुढे ‘आयटी’मधून पदवीचे शिक्षण घेतानाच त्यांनी चित्रकलेची आवड जोपासली. एक विषय घेऊन त्यावर रंगलेखन करण्यासाठी त्यांनी समुद्रावर स्वार होणाऱ्या मासेमारी बोटी हा विषय निवडला आणि समुद्र व आकाश याबद्दलचे असणारे आकर्षण आपल्या चित्रातून मांडले. बोटींवर असणाऱ्या विविध रंगसंगती व बारकावे त्यांच्या चित्रात पाहायला मिळतात. मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाण्याचे धाडस असावे लागते आणि मासे पकडण्यासाठी संयमही असावाच लागतो. संयम आणि धाडस यातला समतोल राखताना रोहितच्या रंगसंगतीने बॅलन्स साधला आहे. स्तब्ध उभी असलेली किंवा समुद्राच्या लाटांवर स्वार असलेली बोट असो, त्याने कोकणातील देखणेपणा ॲक्रिलिक रंगाने कॅनव्हासवर उत्तम रेखाटला आहे. रोहितने अलीकडेच ‘कॅनवास आर्ट व कल्चर फेस्टिवल २०२०’ मधील समूह प्रदर्शनामधून आपली कला सादर केली होती. चित्रांमधील बारकाव्यांचे व देखाव्यांचे चित्रप्रेमींनी कौतुक केले होते. समुद्रात मासेमारी करणाऱ्या या बोटी रोहित यांचा पुढचा प्रवास अधिक आश्‍वासक असेल, याची खात्री देणारा आहे.

loading image