
"कोरोनामुळं रद्द झालेल्या टूरची 75 टक्के रक्कम प्रवाशांना द्या"
मुंबई : प्रवाशांनी पैसे भरलेल्या व नंतर कोरोनामुळे (corona) रद्द झालेल्या टूरच्या किमतीपैकी (tour cost) पंचाहत्तर टक्के रक्कम प्रवाशांना (75% cashback) परत द्यावी, असा महत्वपूर्ण आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने केसरी टूर्सला (kesari tours) दिला आहे. या विषयावर मुंबई ग्राहक पंचायतीचे (mumbai consumer court) अध्यक्ष शिरीष देशपांडे, डॉ. अर्चना सबनीस आदींनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खेर व आयुक्त अनुपम मिश्रा यांनी गुरुवारी हा आदेश दिला आहे. कोरोनाच्या फैलावामुळे (corona pandemic) टूर रद्द झाल्यावर सुमारे 461 ग्राहकांचे अंदाजे सात कोटी रुपये केसरीने थकविल्याच्या तक्रारी मुंबई ग्राहक पंचायतीकडे आल्या होत्या.
या ग्राहकांना या रकमेसाठी केसरीने सन 2024 च्या अखेरपर्यंत कोठेही वापरता येणारा क्रेडिट शेल किंवा काही रक्कम कापून परतावा, असे पर्याय दिले होते. मात्र विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण पैसे तत्काळ परत हवे होते. पण आम्ही टूरच्या कालावधीपूर्वीच विमानप्रवास, हॉटेल, रेस्टोरंट, स्थानिक प्रवास, स्थानिक एजंट व्हिसा शुल्क, जीएसटी आदींची रक्कम भरलेली असते. टूर रद्द झाल्यास त्यातील बहुतांश रक्कम आम्हालाही परत मिळत नाही. विमानाचे आधीच केलेले ग्रूपबुकिंग नॉन रिफंडेबल असते.
अनेक विमान कंपन्यांनीही आम्हाला पैसे परत दिले नाहीत. खरेतर प्रवाशांशी केलेल्या करारातील फोर्स मेजुरे क्लॉज नुसार नैसर्गिक आपत्ती आदी अपरिहार्य कारणांमुळे टूर रद्द झाल्यास त्याचा परतावा मिळत नाही. तरीही आम्ही प्रवाशांना आकर्षक असा क्रेडिट शेलचा किंवा काही रक्कम कापून परताव्याचा पर्याय दिला आहे, असे केसरीतर्फे वरिष्ठ व्यवस्थापक अजित सावे यांनी सांगितले.
केसरी ने कापलेली किमान 25 टक्के रक्कम अनफेअर डीडक्शन स्वरुपातील असून ती वगळून उरलेली 75 टक्के रक्कम परत द्यावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आली. तर ती मागणी केसरी टूर्स ने फेटाळली. टूर रद्द झाल्या यात प्रवाशांचा दोष नसून टूर कंपन्यांचा तोटा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी प्रवासी हे त्यातील गुंतवणुकदार नाही, त्यामुळे त्यांना सर्व पैसे परत मिळावेत, असे ग्राहक पंचायतीने सांगितले.
तर कोरोना काळात रद्द व बदललेल्या टूर हे फक्त सरकारच्या धोरणामुळे झाल्याने यात कोणाचाही तोटा होऊ नये हे पाहिजे. त्यामुळे टूर कंपन्यांचे कॅन्सलेशन चार्जेसदेखील सुयोग्य व प्रत्यक्ष खर्च आणि सेवाशुल्काच्या प्रमाणातच हवेत, असे मत प्राधिकरणाने व्यक्त केले. त्यामुळे केसरीने परताव्यात केलेली कपात ही अवाजवी असल्याचे सांगून प्राधिकरणाने वरील आदेश दिला. ज्यांना क्रेडीट शेल नको असेल त्यांना पंधरा दिवसांत टूर कॉस्टच्या 75 टक्के रक्कम द्यावी. विमान कंपन्यांनी केसरी टूर्सला पैसे परत दिले की ती रक्कमही प्रवाशांना द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.