esakal | श्री गुरू बृहस्पतींचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

श्री गुरू बृहस्पतीं

श्री गुरू बृहस्पतींचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर नागपूर जिल्ह्यात

sakal_logo
By
रवींद्र कुंभारे

हिंगणा (जि. नागपूर) : तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले श्री देवगुरू बृहस्पती धाम क्षेत्र चौकी हे महाराष्ट्रातील दुर्मीळ असे एकमेव मंदिर आहे. राज्यातील तीर्थक्षेत्राचा विचार केला असता आपल्याला सर्वच देवांची मंदिरे पाहायला मिळतात. मात्र, सर्व देवांचे गुरू म्हणून श्री गुरू बृहस्पतींची ओळख अध्यात्मात सांगितली आहे. अशा गुरूंचे मंदिर मात्र महाराष्ट्रात कुठेच नाही. ते एकमेव हिंगणा तालुक्यातील सावळी बिबी ग्रामपंचायतअंतर्गत स्थित चौकी वनग्राम येथे पाहायला मिळते.

मंदिराचे निर्माण कुणी केले याचा पुरावा नाही. मात्र, येथील पुरातन वास्तू या पांडवकालीन असल्याचे काही तज्ज्ञांनी मान्य केले आहे. त्यामुळे या मंदिराची निर्मिती पांडव काळात झाली असावी असा अंदाज आहे. हे मंदिर घनदाट जंगलाने व्यापलेले असल्याने या परिसरात स्वातंत्र्यानंतर १९६२ ला वनविभागाने वनांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी ५ ते ६ आदिवासी कुटुंबांना वसवले व वनविभागाच्या चौकीची निर्मिती केली. तेव्हापासून या ठिकाणाला चौकी गाव असे नाव देण्यात आले.

हेही वाचा: १५ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; प्रियकराविरुद्ध गुन्हा

आस्थेचे ठिकाण

या ठिकाणी परिसरातील लोकांची व हिंगणा तालुक्यातील राजकारणी मंडळींची विशेष आस्था आहे. निवडणूक काळामध्ये याच मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यावर विशेष भर दिला जातो. परिसरातील लोकांच्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात याच ठिकाणाहून करण्याची प्रथा आहे.

गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व

सर्व देवांचे गुरू श्री देवगुरू बृहस्पतीचे हे मंदिर असल्याने याठिकाणी गुरुपौर्णिमेला मोठी यात्रा भरते. ५ ते ६ हजार भाविक सकाळपासून दर्शनाला गर्दी करतात. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

हेही वाचा: चक्क डॉन सफेलकरच्या बायकोशी मैत्री; अन् घडला थरारक हत्याकांड

कसे जावे

हे तीर्थक्षेत्र नागपूरच्या दक्षिणेकडे हिंगणा मार्गे ५५ किलोमीटरवर आहे. महाराष्ट्र शासनाने या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा ‘ब’ दर्जा दिला असून, येथे मोठ्या प्रमाणावर विकास सुरू आहे.

loading image
go to top