अंदमानची फटाकडी

अंदमानची सफर म्हटल्यावर आपल्याला आठवतात स्वतंत्र्यवीर सावरकर व अंदमानची काळकोठडी. सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या अंदमानच्या वन्यजीव विश्वाबद्दल मात्र फारसे कुणाला अजूनही माहीत नाही.
Bird
BirdSakal

अंदमानमधील ‘फटाकडी’ला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे स्वप्न होते; पण पूर्वानुभवानुसार ते स्वप्न कधीच खरे होणार नाही, असेच वाटायचे. २०२० च्या अंदमानभेटीदरम्यान इतर पक्ष्यांची फोटोग्राफी करत असताना कुणीतरी ‘फटाकडी’ असे ओरडला. आम्ही उत्साहाने तिथे पोहोचलो तोवर ती झुडपात घुसली... पण पाचच मिनिटांत नर व मादीची जोडी झुडपातून बाहेर आली. हळूहळू आमच्यासमोर कचरा टाकलेल्या ढिगावर अन्न वेचू लागली...

अंदमानची सफर म्हटल्यावर आपल्याला आठवतात स्वतंत्र्यवीर सावरकर व अंदमानची काळकोठडी. सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या अंदमानच्या वन्यजीव विश्वाबद्दल मात्र फारसे कुणाला अजूनही माहीत नाही. त्या दृष्टीने अजून फारसे प्रयत्न झालेले नाहीत. आम्ही कोरोना सुरू व्हायच्या आधी म्हणजे मार्च २०२० ला व त्यापूर्वी दोन वेळा अंदमानच्या पक्ष्यांचे छायाचित्रण करण्याकरिता अंदमानला गेलो होतो. नैसर्गिक सौंदर्याप्रमाणेच तेथील पक्षीविश्वदेखील समृद्ध आहे. किंबहुना पुढील काळात जर येथे अतिप्रमाणात जंगलतोड झाली नाही, तर केवळ पक्षिनिरीक्षणाकरिता येथे लोक येऊ शकतील व वन्यजीव पर्यटनाला चालना मिळू शकेल. २०१६ ला पहिल्यांदा आम्ही तिथे गेलो. त्यानंतर २०२० च्या दौऱ्यात असे जाणवले, की नवनवीन रिसॉर्ट्सचे बांधकाम सुरू आहे व त्याकरिता बरीचशी जंगलतोड झालेली आहे. त्यामुळे काळा बाज (ब्लॅक बाजा)सारखा दुर्मिळ पक्षी जो सहजपणे तिथे दिसायचा, तो आतासा दिसत नाहीये.

अंदमानच्या पक्ष्यांबद्दल एक मजेशीर माहिती अशी, की काही पक्षी केवळ तिथेच दिसतात. विशेषतः अंदमानची पाच प्रकारची घुबडे आहेत. बरेचसे पक्षी भारतात दिसतात, तेच तिथे आहेत; पण त्यांचा आकार मात्र लहान असतो. अशाच अंदमानच्या फटाकडीचे छायाचित्र पाहून तिच्या प्रेमातच पडलो. ही फटाकडी (अंदमान क्रेक) अतिशय आकर्षक. तांबडी-लालसर रंगाची. चोच हिरवी-पोपटी. ही केवळ अंदमानातच दिसते. अत्यंत लाजरी-बुजरी. किंचितशी चाहूल लागताच झुडपात जाऊन लपून बसणारी. ही सतत जमिनीवर असते, शक्यतो झुडपांच्या आसपास. आपल्या जमिनीवरील चालण्याच्या कंपनामुळेदेखील ती सतर्क होते. त्यामुळे तिचे चांगले छायाचित्र मिळणे दुर्लभच, याचा अनुभव आम्हाला यापूर्वीच्या दोन दौऱ्यांमध्ये आला होता. एकदा तर जिथे दिसण्याची शक्यता होती, त्या ठिकाणी आम्ही तीन तास शोध घेत होतो. आठ जणांची आमची टीम. त्या वेळेस आम्हाला झुडपात तिची केवळ शेपटी दिसली होती. त्यावरही आम्ही आनंद कमावला होता.

२०२० च्या दौऱ्यात मात्र आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी गेलो. तिचे छायाचित्र मिळणे महाकठीण असल्याने त्या फटाकडीकरिता वेळ द्यायचा नाही, असे ठरवले होते. तो वेळ इतर पक्षी शोधण्याकरिता देऊ, असे ठरले. त्यामुळेच अत्यंत दुर्मिळ अशी जांभळी कोकीळ (वायोलेट कक्कू) आम्हाला नुसती दिसलीच नाही, तर तिचे उत्तम छायाचित्रसुद्धा मिळाले. तिथेच थांबून आम्ही नाश्ता करायचे ठरवले. पक्षी छायाचित्रणाला भल्या पहाटे निघतो. त्यामुळे नाश्ता बरेचदा सोबत बांधूनच घेतो.

नाश्ता बाहेर काढणार इतक्यात आमचा मार्गदर्शक डॅनिश ‘क्रेक’ असे ओरडला. आम्ही नाश्ता तिथेच सोडून धावलो. इतर सोबती अननुभवी होते. त्यामुळे उत्साहाने पळत सुटले. आम्हाला मात्र पूर्वीच्या अनुभवामुळे ठाऊक होते, की हे सर्व धावले की ती फटाकडी झुडपात जाऊन लपणार. पुन्हा बाहेर पडणार नाही. त्यामुळे आम्ही सावकाश चालत गेलो. अपेक्षेप्रमाणे आम्ही सर्व तिथे पोहोचलो, तोवर ती फटाकडी झुडपात घुसली... पण केवळ पाचच मिनिटात नर व मादी दोन्हीही झुडपातून बाहेर आली. आम्ही सर्वांना आहात तिथेच जमिनीवर बसा, असे इशाऱ्याने सांगितले. आम्ही सगळे बसलो. हळूहळू नर-मादी दोन्हीही आमच्यासमोर १५-२० फुटांवर असलेल्या कचरा टाकलेल्या ढिगावर, आपल्याच विश्वात रमून अन्न वेचू लागली. आमचाच नाही तर आमच्या मार्गदर्शकाचादेखील त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आम्ही पुढील अर्धा-पाऊण तास आमच्या समोर असलेल्या त्या फटाकड्यांच्या वावर आमच्या कॅमेऱ्यात टिपण्यात गुंग झालो होतो. अंदमान फटाकडीसोबतचा तो अर्धा-पाऊण तास कायम लक्षात राहील. अजूनही तो प्रसंग आठवला तरी खरंच आम्ही त्यांना इतक्या मोकळ्या जागेत व इतका भरपूर वेळ पाहिले, यावर विश्वास बसत नाही.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com